नवी मुंबई : नवी मुंबईत शनिवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० या अवघ्या आठ तासांत ११३.२० मिमी पावसाची नोंद झाली. दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. ठाणे-बेलापूर मार्ग, शीव-पनवेल महामार्गासह अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर नागरिकांना आपल्या इच्छित स्थळी जाण्या-येण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
दुपारी भरतीची वेळ आणि मुसळधार पाऊस एकाच वेळी आल्याने काही सखल भागांतील पाण्याचा निचरा उशिराने झाला. त्यामुळे विविध भागांत पाणी साचल्याच्या तक्रारी वाढल्या. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडे सायंकाळपर्यंत ११ ठिकाणी पाणी साचल्याच्या, १० झाडे पडल्याच्या आणि एका झाडाची फांदी पडल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या. संबंधित विभाग, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाणी उपसा, झाडे हटविणे आणि वाहतूक सुरळीत करण्याची कार्यवाही केल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शुक्रवारीच अभियांत्रिकी, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, उद्यान आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. तसेच कोणत्याही परिस्थितीत सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात उपलब्ध राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विविध विभागांची पथके दिवसभर फिल्डवर कार्यरत राहून पाणी उपसा, पाण्याचा निचरा तसेच आपत्कालीन मदतकार्य करत होती. महापौर सुजाता पाटील यांनीही विविध सखल भागांची पाहणी करून संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
नवी मुंबई समुद्रसपाटीपेक्षा खालच्या पातळीवर वसलेले शहर असल्याने भरतीच्या काळात मुसळधार पाऊस झाल्यास सखल भागांत पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने आवश्यक ठिकाणी अतिरिक्त पाणी उपसा पंप कार्यान्वित केले. दुपारी २.५० वाजता ४.२६ मीटर उंचीची भरती झाल्यानंतर मध्यरात्री २.५२ वाजता ३.६० मीटर उंचीची भरती अपेक्षित असल्याने सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी केला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सखल भाग, खाडी परिसर व समुद्रकिनारी जाणे टाळावे, तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालविताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
ऐरोलीत सर्वाधिक १६१ मिमीची नोंद
शनिवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० या आठ तासांच्या कालावधीत नवी मुंबईत सरासरी ११३.२० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामध्ये ऐरोली येथे सर्वाधिक १६१ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल दिघा येथे १३४.६० मिमी, कोपरखैरणे येथे १३१.४० मिमी, बेलापूर येथे ९३.४० मिमी, वाशी येथे ९२.८० मिमी आणि नेरुळ येथे ६६ मिमी पावसाची नोंद झाली. ऐरोली, दिघा आणि कोपरखैरणे या पट्ट्यात दिवसभर पावसाचा सर्वाधिक जोर कायम राहिला.
