नवी मुंबई: रविवारी पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास सीबीडी शहाबाज गावात असणाऱ्या उड्डाणपुलाखाली एका ६५ वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी संशयित आरोपीस उपस्थित लोकांनी चोप दिल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र या घटनेनंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सोमवारी सकाळपासून त्यांनी शहरातील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या लोकांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई धडाक्यात सुरु केली आहे. हि कारवाई दिवसभर सुरू राहणार आहे. या निराश्रित यांच्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

नवी मुंबईत सीबीडी शहाबाज गाव, सी वुड्स, कोपरखैरणे महापे, सानपाडा, वाशी अशा विविध उड्डाणपुलाखाली निराश्रित भिकाऱ्यांची वस्ती असते. सी वुड्स येथील उड्डाण पुलानजीक एक मोठा मॉल असून येथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या भिकाऱ्यांचा प्रचंड त्रास होत असतो. यावर लोकसत्ताने विशेष वृत्त दिल्यावर त्याठिकाणी कारवाई करण्यात आली. यापूर्वीही भिकाऱ्यांवर कारवाई करताना मनपाचे अतिक्रमण पथक आणि पोलिसांच्यावरही दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र मनपाने ठोस कारवाई केली नव्हती.

उड्डाणपुलाखाली आश्रय घेणे दिवसभर चौकात भीक मागून गुजराण करणे असा दिनक्रम त्यांचा असतो. मात्र रात्रीच्या वेळी मद्य प्राशन करून अनेक जण धिंगाणा घालून आरडाओरडा केल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त होतात. मात्र कारवाई बाबत पोलीस प्रशासन आणि मनपा एकमेकांच्याकडे अंगुली निर्देश करत असल्याचे चित्र आहे. मात्र रविवारी शहाबाज गावातील उड्डाणपुलाखाली झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर दगड घालून हत्या झाल्याच्या घटनेने मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी सकाळी कोपरखैरणे , सानपाडा आणि शहाबाज गावातील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्यांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. येथे सुरक्षा जाळी लावण्यात येणार आहे. याबाबत अतिक्रमण उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले कि राहणारे हे भारतीय नागरिक आहेत. त्यांना राहण्यासाठी बेलापूर येथे जागा करून देण्यात आलेली आहे. आता अन्य जागेचा शोध मनपा घेत आहे. अशा लोकांच्यासाठी अजून काही ठिकाणी रात्र निवारा करून देण्याबाबत मनपा लवकरच ठोस निर्णय घेणार आहे.