नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एनएमआयए) बुधवारी सकाळी साडेदहा वाजता सर्वाधिक वजन वाहून नेण्याची क्षमता असलेल्या विमानांपैकी एक ‘अँटोनोव्ह एएन – १२४ रुस्लान’चे आगमन झाले. अबुधाबीहून सुमारे ४६ टन माल घेऊन आलेल्या या विमानाचे जलतोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. मोठ्या आकाराची आणि विशेष स्वरूपाची मालवाहतूक हाताळण्याची विमानतळाची क्षमता या निमित्ताने अधोरेखित झाली.
‘अँटोनोव्ह एएन-१२४ रुस्लान’ हे कोड एफ श्रेणीतील रुंद आकाराचे मालवाहू विमान आहे.

अवजड यंत्रसामग्री, मोठ्या आकाराचे साहित्य आणि विशेष स्वरूपाचा माल वाहून नेण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो. विमानाच्या कमाल संरचनेनुसार १५० टनांपर्यंत मालवाहतूक करण्याची क्षमता आहे. व्यावसायिक सेवांमध्ये साधारणपणे १२० टनांपर्यंत माल वाहून नेण्याची क्षमता असते. बुधवारी या विमानातून अबुधाबीहून सुमारे ४६ टन माल नवी मुंबईत आणण्यात आला.

नवी मुंबई विमानतळावर यापूर्वीच आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सेवांचा विस्तार सुरू झाला आहे. हाँगकाँग आणि दुबईसाठी समर्पित मालवाहू विमानसेवा सुरू झाल्याने विमानतळाची आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतूक जोडणी वाढली आहे. हाँगकाँगसाठी आठवड्यातून तीन, तर दुबईसाठी आठवड्यातून तीन मालवाहू सेवा नियोजित आहेत. या सेवांमधून ई-कॉमर्स वस्तू, अभियांत्रिकी साहित्य, औषधे, नाशवंत वस्तू आणि अन्य मालाची वाहतूक होणार आहे. मोठ्या आकाराच्या मालवाहू विमानाचे आगमन आणि वाढत्या समर्पित कार्गो सेवांमुळे नवी मुंबई विमानतळाच्या मालवाहतूक क्षमतेत वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले.