नवी मुंबई : १९ हजार कोटी रुपये खर्चून सहा महिन्यांपूर्वी कार्यान्वित झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पावसाळ्यापूर्वीच पाण्याच्या गळतीची घटना समोर आली आहे. विमानातून टर्मिनलपर्यंत सामान पोहोचविणाऱ्या बॅगेज बेल्ट परिसरात पाणी गळत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर विमानतळाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे ही गळती झाली असून ती तातडीने दुरुस्त करण्यात आल्याचा दावा विमानतळ संचालन कंपनीने केला आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे विमानतळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबई आणि पनवेल परिसर राज्याचे नवे आर्थिक केंद्र ठरेल, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडची ७४ टक्के, तर सिडकोची २६ टक्के भागीदारी आहे. पहिल्या टप्प्यातील एका टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील वर्षी डिसेंबर महिन्यात विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते.

सध्या या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू असून दररोज सुमारे २० हजार प्रवासी प्रवास करतात. दररोज सुमारे १५० विमान हालचाली होत असून वर्षअखेरीस प्रवाशांची संख्या ५० हजारांपर्यंत आणि विमान हालचाली ३८० पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात अॅपआधारित टॅक्सी चालकांच्या संपामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला होता.

त्यानंतर आता पाण्याच्या गळतीचा प्रकार समोर आल्याने विमानतळ व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बुधवारी वातानुकूलन यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने बॅगेज बेल्टवर गळतीचे पाणी पडत होते. संबंधित बिघाड तातडीने दूर करण्यात आला असून विमानसेवा आणि प्रवासी सुविधांवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती विमानतळ संचालन कंपनीने ‘लोकसत्ता’ला दिली.