नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी अझरबैजानमधील बाकू येथून सिल्क वे वेस्ट एअरलाइन्सचे बोईंग ७७७ एफ मालवाहू विमान मंगळवारी सुमारे ९० मेट्रीक टन आयात माल घेऊन दाखल झाले. यापूर्वी या विमानतळावर अबूधाबी, शारजाह, हॉंगकॉंग आणि जर्मनीतील फ्रँकफर्ट-हॅन या विमानतळावरून थेट मालाची आयात करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारच्या अझरबैजान येथून आलेल्या भव्य विमानाचे पाण्याच्या तोफेने सलामी देऊन स्वागत करण्यात आले. वेगवेगळ्या देशांतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर होत असलेल्या हवाईमार्गे माल वाहतूकीच्या आयात निर्यातीला चालना मिळणार आहे. 

जगातील मोठ्या दुहेरी इंजिन असलेल्या मालवाहू विमानांपैकी एक असलेल्या बोईंग ७७७ एफच्या या लँडिंगचे विमानतळ प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. बाकू आणि नवी मुंबईदरम्यान थेट मालवाहतूक संपर्क या सेवेमुळे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या मालवाहतूक क्षमतेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.या सेवेमुळे भारतासह सीआयएस देश, युरोप आणि पश्चिम आशियातील बाजारपेठांशी मालवाहतुकीचा संपर्क वाढण्यास मदत होणार असल्याचा दावा एनएमआयएएलने केला आहे. उद्योग, व्यापार आणि निर्यातदारांसाठी हवाई मालवाहतुकीचे नवे पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी विमानसेवांबरोबरच मालवाहतूक सेवांच्या विस्तारालाही प्राधान्य देण्यात येत आहे. सिल्क वे वेस्ट एअरलाइन्सच्या मालवाहू विमानाच्या आगमनामुळे विमानतळाच्या कार्गो सुविधांचा व्यावसायिक वापर सुरू झाला असून, पश्चिम भारतातील मालवाहतुकीसाठी हे विमानतळ महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नांना यामुळे चालना मिळणार आहे.