नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी आणि मालवाहतूक व्यवस्थेला जोडणाऱ्या प्रमुख पुलांचे आणि रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून सिग्नल यंत्रणाही सज्ज आहे. मात्र त्यांचे अद्याप उद्घाटन न झाल्याने बेलापूर, उलवे, पनवेल, खांदेश्वर, करंजाडे भागातून विमानतळाकडे जाणाऱ्या वाहतुकीला नवा पर्याय उपलब्ध होऊ शकलेला नाही.
विमानतळाच्या पूर्व बाजूचे दळणवळणाचे जाळे पूर्णत्वास आले आहे. यामुळे कळंबोली जंक्शनकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वरील वाहने थेट विमानतळाच्या कार्गो प्रवेशद्वारापर्यंत पोहोचू शकतील. त्यामुळे जेएनपीए बंदरातून येणाऱ्या कंटेनर वाहतुकीला विमानतळाच्या मालवाहतूक विभागात थेट प्रवेश करता येणार असून बंदर आणि विमानतळ यांच्यातील मालवाहतुकीसाठी स्वतंत्र आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे. राज्यात कंटेनरला थेट विमानतळाच्या कार्गो प्रवेशद्वाराशी थेट जोडणारा हा पहिलाच प्रयोग आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उभारण्यात येणाऱ्या पूर्वेकडील इंटरचेंजसह सिडको मंडळाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या एसबीआर-९ मार्गाने विमानतळाच्या उत्तर बाजूच्या रस्त्यापर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे विमानतळाच्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. सिडको मंडळाने विमानतळाच्या कार्गो प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या ६० मीटर रुंदीच्या पुलासाठी १९१ कोटी रुपये खर्च केले आहेत. या मार्गामुळे बेलापूर, उलवे येथून विमानतळाच्या प्रवासी आणि कार्गो प्रवेशद्वाराजवळून पनवेल शहर, करंजाडे आणि कळंबोलीकडे जाता येणार आहे.
खाडी क्षेत्रावर उभारण्यात आलेले ६० मीटर रुंदीचे पूल खांदेश्वर रेल्वेस्थानकाच्या पश्चिम भागाशी तसेच पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी परिसराशी जोडण्यात आले आहेत. या पुलांसह रस्त्यांच्या कामासाठी ६२२ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या जोडणीमुळे बेलापूरच्या पामबीच मार्गावरून पनवेलकडे येताना शीव-पनवेल महामार्गावर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे. सध्या विमानतळालगतचा सेवा रस्ता उपलब्ध झाल्याने बेलापूरहून उलवे मार्गे पनवेल, करंजाडे आणि खांदेश्वरकडे जाता येते. मात्र नव्या पुलांवरील वाहतूक सुरू झाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाचा वळसा टाळता येणार आहे.
या पूल आणि रस्ते जोडणीसाठी ८१३ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. वाहतूक सुरू झाल्यानंतर खांदेश्वर, कामोठे परिसर आणि पनवेल शहरातील वाहतुकीला शीव–पनवेल महामार्गाला पर्यायी मार्ग मिळणार असून या महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. उद्घाटनानंतर ही जोडणी सर्वसामान्य वाहतुकीसाठी खुली होईल अशी अपेक्षा आहे.
रस्ते कोठून कसे?
कळंबोली जंक्शनकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ वरील वाहने थेट विमानतळाच्या कार्गो प्रवेशद्वारापर्यंत
एसबीआर-९ मार्गाने विमानतळाच्या उत्तर बाजूच्या रस्त्यापर्यंत
खाडी क्षेत्रावर उभारण्यात आलेले ६० मीटर रुंदीचे पूल खांदेश्वर रेल्वेस्थानकाच्या पश्चिम भागाशी तसेच पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी परिसराशी जोडण्यात आले आहेत.
नव्या पुलांवरील वाहतूक सुरू झाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाचा वळसा टाळता येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत दळणवळण उत्तम होण्यासाठी सिडको मंडळासह इतर प्राधिकरणांची कामे सुरू आहेत. त्यापैकी विमानतळाच्या कार्गो प्रवेशव्दाराजवळील सेवा रस्ता व पुलांचे बांधकाम झाले असले तरी सुरक्षेची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण झाल्यावर वरिष्ठांच्या निर्देशानंतर माननिय महोदयांच्या हस्ते उदघाटन करून दळणवळण सुरू केले जाईल.- अश्विन मुद्गल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ
