नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) व्यावसायिक विमानसेवा सुरू केल्यानंतर अवघ्या आठ महिने आठ दिवसात ३० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे. २५ डिसेंबर २०२५ रोजी सेवा सुरू झाल्यानंतर २०० दिवसांपेक्षा कमी कालावधीत विमानतळावरून अबुधाबीला नियोजित आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू झाली. विमानतळावरील गंतव्यस्थानांची संख्या आता १३ वरून ४६ झाली असून, सुमारे २२ हजार ५०० व्यावसायिक विमानफेऱ्या हाताळण्यात आल्याची माहिती गुरूवारी नवी मुंबई विमानतळ प्रशासनाने दिली.

ऑगस्टमध्ये विमानतळावर सरासरी ९४ टक्के प्रवाशांना त्यांची शेवटची सामानाची बॅग निर्धारित वेळेत मिळाली. प्रवाशांना सुरळीत सेवा देण्यावर विमानतळ प्रशासनाचा भर असल्याचे या कामगिरीतून दावा केला आहे. मुंबई महानगर प्रदेशाला देशातील प्रमुख शहरांशी जोडण्याच्या दृष्टीने विमानतळाच्या हवाई मार्गिकांमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. यापुढे उदयपूर, जोधपूर, रांची, दरभंगा, गुवाहाटी आणि सिंधुदुर्ग या सहा नव्या देशांतर्गत गंतव्यस्थानांचा समावेश होणार आहे. त्यामुळे या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना नवी मुंबई विमानतळावरून अधिक हवाई पर्याय उपलब्ध होतील. हिवाळी वेळापत्रक सुरू होण्यापूर्वी नोव्हेंबर २०२६ मध्ये नव्या विमान कंपन्या आणि हवाई मार्गिकांचा समावेश करून आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काचा आणखी विस्तार करण्याचे विमानतळ कंपनीचे नियोजन आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त हवाई मार्गिका आणि विमान कंपन्यांच्या भागीदारीच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील हवाई संपर्क आणखी चांगले करण्याबरोबरच पश्चिम भारतासाठी महत्त्वाचे हवाई प्रवेशद्वार म्हणून हे विमानतळाची ओळख होईल असे नियोजन केले जात आहेत. 

पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर विमानतळाची वार्षिक नऊ कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल. प्रारंभीच्या टप्प्यात दोन कोटी प्रवाशांची वार्षिक क्षमता विकसित करण्यात आली आहे. तसेच दरवर्षी पाच लाख मेट्रिक टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडको महामंडळ यांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून विद्यमान विमानतळावरील वाढता हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यासह नवी मुंबई परिसरातील आर्थिक आणि शहरी विकासाला चालना देण्याची अपेक्षा आहे.