नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (एनएमआयए) येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडको मंडळाने जाहीर केला आहे. देशांतर्गत उड्डाणांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता नवी मुंबई थेट जागतिक हवाई नकाशावर झेप घेण्यास सज्ज झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात या विमानतळाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या कार्यान्वित झाला. ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर २५ डिसेंबरपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली. सध्या देशातील ७६ शहरांशी जोडलेल्या या विमानतळावरून दररोज सुमारे १५० विमानांची ये-जा होत असून दररोज जवळपास १९ हजार प्रवासी प्रवास करत आहेत.

या पार्श्वभूमीवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा ठोस आराखडा मांडला आहे. या आराखड्यानूसार यापुढील सर्व विकासाची पायाभरणी विमानतळ भोवतालच्या क्षेत्रातच करण्याचा मानस सिडकोने व्यक्त केला आहे. एप्रिल अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीची सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यामुळे नवी मुंबईची जागतिक संपर्कक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी २ कोटी प्रवासी आणि ०.५ दशलक्ष टन मालवाहतुकीची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. ३,७०० मीटर लांबीची धावपट्टी मोठ्या वाइड-बॉडी विमानांच्या उड्डाणासाठी सक्षम असून भविष्यातील वाढत्या हवाई वाहतुकीसाठी भक्कम पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पुढील टप्प्यात टर्मिनल-२, सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स, मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब आणि जनरल एव्हिएशन टर्मिनल उभारण्याची योजना आहे. तसेच वॉटर टॅक्सी सेवा आणि फेडएक्स कार्गो हब सुरू करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे.आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या प्रारंभामुळे नवी मुंबई केवळ देशांतर्गतच नव्हे, तर जागतिक स्तरावरही महत्त्वाचे हवाई केंद्र म्हणून उदयास येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.