पहिल्या उड्डाणाला आणखी दोन वर्षांची प्रतीक्षा

नवी मुंबई पुढील वर्षी एप्रिल महिन्यात नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण होण्याचे भाजप सरकारच्या काळातील आश्वासन हवेत विरून गेले आहे. विमानतळ धावपट्टीच्या कामाला प्रत्यक्षात अद्याप सुरुवात न झाल्याने नवी मुंबई विमातळाला आणखी दीड ते दोन वर्षे विलंब होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

विमानतळासाठी लागणारे सपाटीकरण पूर्ण झाले असले तरी धावपट्टी आणि टर्मिनल या कामांचा अद्याप ठावठिकाणा नसल्याने हे उड्डाण लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येते. विमानतळाच्या या रखडपट्टीला सध्याची आर्थिक मंदी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

राज्यातील पहिल्या युती शासनाच्या काळात २१ वर्षांपूर्वी नवी मुंबई विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, पर्यावरणविषयक परवानग्या या चक्रव्यूहात अडकलेल्या या प्रकल्पाच्या कामाला फेब्रुवारी महिन्यात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. नवी मुंबई विमातनळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार आहे. या प्रकल्पासाठी दहा गावे स्थलांतरित करण्यात आली आहेत. या दहा गावांतील ६७१ हेक्टर जमिनी या प्रकल्पासाठी लागणार आहे. सध्या ही गावांची जमीन मोकळी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आतापर्यंत विमानतळाची रखडपट्टी ही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व पुनस्र्थापना या कारणाने होत होती मात्र सध्या विमानतळासाठी लागणाऱ्या ११६० हेक्टर जमिनीचे सपाटीकरण झाल्यानंतरही विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. संपूर्ण विमानतळाचे काम करणाऱ्या जीव्हीके लेड कंपनीने धावपट्टी व टर्मिनल चे काम एल अ‍ॅण्ड टी या बांधकाम कंपनीला दिलेले आहे. त्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही. त्यामुळे विमानतळाच्या बांधकामाचे एकूण गणितच बिघडू लागले असून विमानतळावरील पहिल्या उड्डाणाला आता दीड ते दोन वर्षांचा विलंब होणार आहे.

मोदींच्या हस्ते उद्घाटन

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाच्या कामाचा शुभारंभ झाला होता. त्यावेळी या विमानतळावरील उड्डाण २०२० पर्यंत होईल असे जाहीर करण्यात आले होते मात्र आता हे उड्डाण २०२२ अखरे पर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई विमानतळाला अडसर ठरणारी उलवा टेकडीची उंची कमी करताना निघालेल्या मातीच्या भरावाने आवश्यक सपाटीकरण झालेले आहे. यानंतर विमानतळाची धावपट्टी आणि इतर प्रमुख कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या विमानतळावरील पहिले उड्डाण होण्यास आता विलंब लागणार आहे.

– लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.