नवी मुंबई : दूरसंचार विभागाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दूरसंचार कंपन्यांना (टेल्को) त्यांचे नेटवर्क उभारण्याची परवानगी देण्यास नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. (एनएमआयएएल) ला सांगितले आहे. विमानतळावर मोबाइल सेवा नसल्याने प्रवाशांनी तक्रारी केल्या होत्या.

विमानतळ संचालकांनी दूरसंचार कंपन्यांना स्वत:चे जाळे उभारण्याऐवजी त्यासाठी विमानतळावरील सुविधांचा वापर करण्याची सक्ती केली होती, आणि त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क अवाजवी असल्याचे कंपन्यांचे म्हणणे होते. तसेच दूरसंचार कायद्यानुसार विमानतळ ही सार्वजनिक संस्था आहे. त्यामुळे दूरसंचार कायद्यानुसार परवानाधारक दूरसंचार सेवा प्रदात्यांना विमानतळ परिसरात सेवा जाळे उभारण्यासाठी परवानगी देण्याचे निर्देश दूरसंचार विभागाने अदानी एअरपोर्ट होल्डग्िंस लि.ला दिले आहेत.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) या संघटनेकडून  आलेल्या मागणीनंतर १६ फेब्रुवारी रोजी अदानी समूहाच्या कंपनीला कायदा आणि नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. ‘दूरसंचार कायदा २०२३ आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही ‘सार्वजनिक संस्था’ ठरते,’’ असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.  त्यामुळे या इमारतीतील दूरसंचार जाळे उभारण्यासाठी परवानगी देणे बंधनकारक आहे असे नमूद आहे.