उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन पाच महिने झाले असूनही विमानतळाला माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. याच नामकरणाच्या मागणीसाठी सोमवारी सर्वपक्षीय नामकरण समिती मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिलीृ.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांतील लाखो भूमिपूत्र प्रकल्पग्रस्त गेली पाच वर्षे आंदोलने केली. तसेच सिडकोला लाखोंच्या संख्येने घेराव घातला होता. या सर्व आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचा ठराव मंजूर केला व तो राज्य सरकारने पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवून दिला.

पण आज तीन वर्षे होऊनही केंद्र सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व प्रमुख कार्यकर्ते यांची एक बैठक घेऊन हा नामांतराचा प्रश्न केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार येत्या तीन महिन्यात सुटेल, असे खात्रीपूर्वक आश्वासन दिले. पण अजूनही दि. बां. च्या नावाचा प्रश्न सुटलेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ ऑक्टोबर रोजी विमानतळाचे उद्घाटन केले. त्यानंतर २५ डिसेंबर २०२५ रोजी या विमानतळावरून प्रवाशी वाहतूक सुरू झाली आहे. पण अजूनही केंद्र सरकारने या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही. केंद्राच्या या दिरंगाईमुळे लाखो भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे.

या असंतोषाचा कधी भडका उडेल व त्यातून प्रचंड मोठे आंदोलन उभे राहिल, याची वाट न पाहता केंद्र सरकारने या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे. या प्रश्नाचा विचारविनिमय करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात साठी दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक जिल्ह्यातील कार्यकत्यांची बैठक कोपरखैरणे येथील शेतकरी समाज सभागृहात पार पडली. त्या सभेत २३ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला.

कोट –

भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या असंतोषाला वाचा फोडून केंद्र सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या सोमवारी २३ फेब्रुवारीपासून मुंबईत आझाद मैदानात हजारो भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. -दशरथ पाटील, अध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती