नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिल्या टर्मिनलमधून आतापर्यंत सुमारे २३ लाख प्रवाशांनी प्रवास केल्यानंतर सिडकोने विमानतळाच्या पुढील विस्ताराला गती मिळाली आहे. विमानतळाच्या तिसऱ्या टप्प्यातील विकास तसेच एकत्रित पहिला आणि दुसरा टप्पा यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र अभियंता नियुक्त करण्याची ई-निविदा सिडकोने प्रसिद्ध केली. या प्रक्रियेनंतर विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलच्या उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष वेग मिळणार आहे.

मुंबई येथील विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी दोन धावपट्या असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती करण्यात आली. दुसरे टर्मिनल आणि दुसरी धावपट्टीचा वेळीच विकास केल्यास मुंबई महानगर प्रदेशातील नवी मुंबईचे व्यापारी महत्त्व अधिक वाढणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिले टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर पुढील टर्मिनलच्या उभारणीबाबत उत्सुकता होती. पहिल्या टर्मिनलमधून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आराखड्यात चार टर्मिनलची तरतूद आहे. त्यापैकी पहिले टर्मिनल सध्या कार्यान्वित असून दुसऱ्या टर्मिनलच्या उभारणीसाठी आवश्यक नियोजन आणि तांत्रिक देखरेखीची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती झाल्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी, गुणवत्ता नियंत्रण, वेळापत्रकाचे पालन आणि कामाची तांत्रिक देखरेख सिडकोच्या वतीने केली जाणार आहे. त्यामुळे विमानतळाच्या विस्तार प्रकल्पाला पुढील टप्प्यात गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नियुक्ती कशी?

सिडकोच्या परिवहन आणि विमानतळ विभागाने प्रसिद्ध केलेल्या निविदेनुसार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तिसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी तसेच पहिला व दुसरा टप्पा यांच्या कामकाजासाठी स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी व्यावसायिक संस्था, संयुक्त उपक्रम (जेव्ही) अथवा कन्सोर्टियमकडून ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. संबंधित सल्लागाराची नियुक्ती ३६ महिन्यांसाठी करण्यात येणार असून गुणवत्ता आणि खर्चावर आधारित निवड पद्धतीने अंतिम निवड केली जाईल.