नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले व्यावसायिक देशांतर्गत उड्डाण गुरुवारी होत आहे. येत्या तीन महिन्यांत, म्हणजे मार्च अखेरपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी व कार्गो वाहतूक सुरू केली जाईल, अशी घोषणा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बेलापूर येथे केली.
वार्षिक ९ कोटी प्रवाशांची क्षमता असलेल्या या विमानतळावर पहिल्या वर्षी दोन कोटी प्रवाशांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १५ जानेवारीनंतर, प्रतिदिन ४८ विमानांची ये-जा अपेक्षित आहे. कार्गो वाहतूकही पहिल्याच दिवसापासून सुरू होणार आहे. या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे.
पहिल्या उड्डाणाच्या निमित्ताने खास समारंभाचे आयोजन अदानी कंपनीकडून करण्यात आले आहे. विमानाला वाटरजेट (पाण्याच्या तोफांची) सलामी दिली जाणार असून, ख्रिासमसच्या पार्श्वभूमीवर पहिल्या उड्डाणातील प्रवाशांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. नवी मुंबईहून बंगळूरु, हैद्राबाद, गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी उड्डाणे सुरू होतील. आकाशा एअर, इंडिगो एअरलाईन्स, एअर इंडिया एक्सप्रेस आणि स्टार एअर या कंपन्या सेवा देणार आहेत. गुरुवारी सकाळी आठ वाजता पहिले विमान बंगळूरुहून येथे उतरेल आणि ८ वाजून ४० मिनिटांनी पहिले उड्डाण हैद्राबादला होईल.
विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते, मेट्रो, जलवाहतूक आणि हायस्पीड रेल्वे यांसह बहुविध दळणवळण सुविधा विकसित केल्या जात असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. विमानतळानंतर तिसऱ्या धावपट्टीसाठी अभ्यास करण्यासाठी जागतिक अनुभव असलेल्या संस्थेला नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. या विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल व उरण या परिसराच्या विकासाला गती मिळेल.
