नवी मुंबई : मुंबई व ठाणे उपनगरातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या २५ ऑक्टोबरपासून वाढण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावरील २६५ विमानांची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित झाल्यास दररोज सुमारे ५० ते ५३ हजार हलक्या वाहनांची अतिरिक्त भर नवी मुंबईतील वाहतुकीवर पडण्याचा अंदाज आहे. या वाढीव वाहतुकीमुळे कोंडी होऊ नये आणि मुंबई, ठाणे तसेच पुण्याकडून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळापर्यंत वेळेत पोहोचता यावे, यासाठी नवी मुंबई पोलीस दलाने वाहतूक नियोजनाला सुरुवात केली आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सोमवारी आयुक्तालयात वाहतूक नियोजनाबाबत बैठक घेतली. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्यासह विमानतळाला जोडणारे प्रमुख रस्ते, सध्या सुरू असलेली बांधकामे आणि वाहतूक कोंडीची ठिकाणे यांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांना विनाविलंब आणि कोंडीमुक्त प्रवास मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
मुंबईतून नवी मुंबईत अटलसेतू मार्गे येताना गव्हाण फाटा येथे वाहतूक कोंडी असते. तसेच पामबीच मार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येताना किल्ला जंक्शन, पामबीच मार्गावरील सेक्टर १५ येथेही कोंडी असते. त्या व्यतिरीक्त करंजाडे, उलवे, पळस्पे येथील कोनफाटा आणि कळंबोली सर्कल या ठिकाणी सध्या वाहतुकीचा ताण आहे. या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून वाहतूक नियंत्रण करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. महामार्ग तसेच उड्डाणपुलांची सुरू असलेली कामे वाहतूक कोंडीचे एक मुख्य कारण असल्याने ही कामे कधीपर्यंत पूर्ण होतील, याची माहिती घेण्याचेही नियोजन पोलिसांनी आखले आहे.
विमानतळाकडे येणारी अतिरिक्त वाहने प्रामुख्याने संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेत वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्याचवेळेस अवजड वाहनांची येजा जवाहरलाल नेहरू बंदराकडे सुरू असते. त्यामुळे त्या कालावधीतील वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मुंबईच्या विविध उपनगरांतून थेट विमानतळापर्यंत सार्वजनिक बससेवा उपलब्ध झाल्यास खासगी वाहनांची संख्या कमी होण्यास मदत होईल, या पर्यायावरही बैठकीत चर्चा झाली. परंतू आरटीओच्या माध्यमातून ‘बेस्ट’ प्रशासनाची वातानुकूलित बससेवा सुरू करण्याचा पर्याय विचारात घेण्याचेही बैठकीत मांडण्यात आले. सध्या खारघर ते मुंबई विमानतळापर्यंत अशीच वातानुकूलीत बससेवा सुरू आहे.
सध्या विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाकडून (एनएमएमटी) तरघर आणि खांदेश्वर रेल्वेस्थानकातून बससेवा सुरू आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध उपनगरांतून माफक दरात थेट विमानतळापर्यंत सार्वजनिक वाहतूक उपलब्ध झाल्यास प्रवाशांना खासगी वाहनांऐवजी पर्याय मिळू शकतो.
तसेच विमानतळावरील टॅक्सी थांब्याचे शुल्क आणि वाहनतळ शुल्कामुळे प्रवाशांच्या वाहतूक खर्चात वाढ होत आहे. विमानतळ प्रशासनाने टॅक्सी थांबे सुरू केल्यास हा पर्याय प्रवाशांना मिळू शकेल. टॅक्सीचालकांनी वाहनतळ शुल्क २५० रुपयांहून कमी करून १०० रुपये करण्याची मागणी यापूर्वीच केली होती. आरटीओ विभागाने प्रीपेड तीन आसनी रिक्षा आणि टॅक्सीचे दर निश्चित करण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२५ ( यापूर्वीच) सुरू केली आहे. मात्र थांबे सुरू नाहीत.
“विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गांवरील सुरू असलेली कामे, त्यांची मुदत, वाहनांच्या ये-जा व्यवस्थेसह दिशादर्शक फलकांचा आढावा घेण्यात येईल. खासगी वाहनांवरील ताण कमी करण्यासाठी मुंबईच्या उपनगरांमधून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पर्यायाचाही विचार केला जात आहे. पुढील दोन दिवसांत या विषयाशी सलग्न सर्वच विभागांची एकत्रित बैठक घेऊन त्यातून प्रवाशांच्या सोयीचे नियोजन करण्यात येत आहे.” – मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई
