नवी मुंबई: नवी मुंबई येथे साकार होणाऱ्या ‘नवी मुंबई इंटरनॅशनल मेडीसिटी’ (NMIMC) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या क्लिव्हलँड क्लिनिकसह आंतरराष्ट्रीय भागीदार संस्थांबरोबर सामंजस्य करार केला आहे. तब्बल १.२ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीतून उभारला जाणारा हा प्रकल्प भारतातील आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असलेला पहिला जागतिक दर्जाचा एकात्मिक आरोग्य परिसंस्था प्रकल्प ठरणार आहे.

नवी मुंबई शहर हे केवळ नियोजित नागरी विकासाचे प्रतीक राहिलेले नसून आता ते राज्याच्या आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, किनारी मार्ग, मेट्रो नेटवर्क या ठिकाणी उभे राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आता जागतिक दर्जाचा आरोग्य प्रकल्प ‘नवी मुंबई इंटरनॅशनल मेडीसिटी’ उभारण्यात येत असून, त्यासोबतच ‘एज्युकेशन सिटी’सारखे महत्त्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्पही आकार घेत आहेत. या उपक्रमांमुळे नवी मुंबई हे शहर आरोग्यसेवा, वैद्यकीय संशोधन, उच्च शिक्षण आणि नवोपक्रम यांचे प्रमुख केंद्र होत आहे.

या मेडीसिटी प्रकल्पाच्या माध्यमातून अत्याधुनिक रुग्णसेवा सुविधा, वैद्यकीय संशोधन केंद्रे आणि जागतिक दर्जाचे वैद्यकीय शिक्षण उपलब्ध होणार आहे. तर एज्युकेशन सिटीमुळे देश-विदेशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी आधुनिक शैक्षणिक परिसंस्था विकसित होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करार सोहळ्यात क्लिव्हलँड क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टोमिस्लाव मिहालजेविक, हृदयविकार विभागाचे अध्यक्ष डॉ. समीर कापाडिया, उद्योगपती लक्ष्मी मित्तल तसेच विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प केवळ आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक नसून भारताला जागतिक आरोग्यसेवा आणि वैद्यकीय संशोधनाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘Heal in India’ या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यामध्ये नवी मुंबई इंटरनॅशनल मेडीसिटी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. देशातील तसेच जगभरातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा भारतात उपलब्ध करून देणे, वैद्यकीय पर्यटनाला चालना देणे आणि अत्याधुनिक संशोधनाला प्रोत्साहन देणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १० हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असून वैद्यकीय, संशोधन, तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील कुशल मनुष्यबळासाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा, अत्याधुनिक संशोधन व्यवस्था, वैद्यकीय शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम असलेली ‘नवी मुंबई इंटरनॅशनल मेडीसिटी’ भविष्यात भारताच्या आरोग्य क्षेत्राची नवी ओळख बनणार असून महाराष्ट्राला जागतिक आरोग्य नकाशावर अग्रस्थानी नेणारा हा प्रकल्प ठरेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आपल्या समाजमाध्यमांवरून दिली आहे.

सुमारे २५० एकर क्षेत्रावर विकसित होणाऱ्या या मेडीसिटीमध्ये अत्याधुनिक बहुविशेषज्ञ रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, संशोधन संस्था, जैवतंत्रज्ञान केंद्रे, जीनोमिक्स प्रयोगशाळा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आरोग्यसेवा सुविधा आणि नवोन्मेष केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.