पनवेल : नवी मुंबईची तहान भागविणाऱ्या मोरबे धरणाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामानंतर कामोठे आणि खारघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी सकाळी कामोठेतील सेक्टर ११, सेक्टर ३५ तसेच इतर भागांतील अनेक इमारतींमध्ये नळाद्वारे गढूळ पाणी येऊ लागल्याने रहिवाशांची धावपळ उडाली. पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले असून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

मोरबे धरणातून पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे आणि खारघर या उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. मागील आठवड्यात मोरबे धरणाच्या २२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली होती. या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीतून पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर काही भागांमध्ये मातीमिश्रित व गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

जलवाहिनीतील दुरुस्तीनंतर सुरुवातीच्या टप्प्यात काही प्रमाणात गढूळ पाणी येण्याची समस्या नवीन नसली, तरी यावेळी सलग तीन ते चार दिवस ही परिस्थिती कायम राहिल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अनेक रहिवाशांनी घरगुती वापरासाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.

सिडको, नवी मुंबई महापालिकेकडून पाणी घेऊन कामोठे आणि खारघर परिसराला दररोज सुमारे ५८ ते ६२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा रंग बदललेला असल्याने त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिक साशंक आहेत.

दरम्यान, सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून आणि गाळून वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच जलवाहिनीतील गाळ पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असेही प्रशासनाने सांगितले. याविषयी सिडकोच्या जनसंपर्क विभागाकडे संपर्क साधला मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करण्यापूर्वी पाण्याच्या शुद्धतेची तपासणी केली जात असेल, असे आम्ही गृहीत धरतो. मात्र पाणी गढूळ येत असल्याची माहिती सिडकोला असतानाही नागरिकांनी ते पाणी उकळून किंवा शुद्ध करूनच वापरावे, याबाबत वेळेवर जनजागृती करण्यात आली नाही. मागील आठवड्यापासून ही समस्या सुरू असून नागरिकांचा उद्रेक झाल्यानंतरच प्रशासनाने आवाहन करणे योग्य नाही. — भारती आसबे, सामाजिक कार्यकर्त्या, कामोठे.