प्रवेशद्वारावर सर्वाना मुक्तद्वार

नवी मुंबईतील ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कोकण भवन’च्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आवो जावो घर तुम्हारा अशी परिस्थिती येथे पाहावयास मिळते.

भवनात शासनाची वेगवेळ्या विभागांची एकूण ८४ महत्त्वाची कार्यालये आहेत. रायगड, ठाणे, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यांची शासकीय कामे या ठिकाणहून केली जातात. या चार जिल्ह्य़ांचे प्रत्येक विभागाचे कार्यालय येथे कार्यरत आहेत. यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण आयुक्त राज्य गुप्तचर विभाग, माहिती उपसंचालक  विक्रीकर, महसूल खाते, जातपडताळणी, आयुक्तालय,  सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर विकास विभाग आदी कार्यालये आहेत, असे असतानादेखील येथील सुरक्षेकडे कोणीच गांभीर्याने पाहत नसल्याचे निदर्शनास येत आहे. इमारतीच्या प्रवेशद्वारावरच कोणत्याही प्रकारची चौकशी न करताच आतमध्ये प्रवेश दिला जातो. येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही वाहनांची पाहणी केली जात नाही. गेटसमोर चार सुरक्षारक्षक तैनात केले करण्यात आले आहेत. मात्र ते चौकशी न करताच सहज सर्वाना प्रवेश देतात, असे येथे शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून सांगितले जाते.

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर सर्व महत्त्वाची सरकारी, निमसरकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सीबीडी येथील कोकण भवनच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. मात्र आता तिथे ‘आव जाव घर तुम्हारा’ अशी परिस्थिती आहे. या टोलेजंग इमारतीच्या संरक्षणासाठी आठ पोलीस कर्मचारी तैनात आहेत. मात्र ते पुरेस नसल्याचे सांगितले जाते.  कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अतिरिक्त कामाचा भारही त्यांना उचलावा लागतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. इमारतीच्या आतील सुरक्षेची स्थितीही अतिशय गंभीर आहे. या ठिकाणी मेटल डिटेक्टर, सीसी टीव्ही कॅमेरे, स्कॅनर आदी आधुनिक सुरक्षा उपकरणांचा व ती हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा चौकीत कोणतीही सुविधा नाही. तसेच इतर प्रवेशद्वारासमोर तर सुरक्षा चौकीच अस्तितवात नाही. त्यामुळे येथील सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे.

कोकण भवनच्या सुरक्षेची जबादारी हो पोलीस मुख्यालयावर सोपवलेली आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे येथे सुरक्षेचा अभाव निर्माण होत आहे. याबाबत आम्ही शासनाकडे अधिक सुरक्षा पुरविण्याचे लेखी निवेदन पाठविले आहे. यावर लवकरात लवकर तोडगा निघणार आहे.

एस.एन. थोरात,

नायब तहसीलदार, इमारत देखरेख अधिकारी