नवी मुंबई : शहरातील बचत गट आणि घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे ‘लखपती दीदी’ योजना राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर ही योजना महापालिका हद्दीत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचा प्रस्ताव आगामी महासभेत मांडण्यात येणार आहे. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे रविवारी आयोजित महिला मेळाव्यात महापालिकेचे सभागृहनेते सागर नाईक यांनी याबाबत घोषणा केली.
स्वयं सहाय्यता गटांच्या माध्यमातून महिलांना वर्षाला किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, सूक्ष्म वित्तीय सहाय्य, उद्योजकता विकास आणि विपणनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विविध उपजीविका प्रकल्पांमध्ये महिलांचा सहभाग वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मात्र, केवळ घरगुती पातळीवर उत्पादन तयार करण्यापुरती ही योजना मर्यादित राहणार नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्रीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच नवी मुंबईबाहेर, देशभरात त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असेल. उत्पादन तयार केल्यानंतर त्याच्या विक्रीसाठी महिलांना पुन्हा स्वतंत्रपणे बाजारपेठ शोधावी लागू नये, यासाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यावर भर दिला जाणार आहे.
‘आता लक्ष आगामी महासभेकडे ठेवा. लखपती दीदी योजनेचा विषय लवकरच महासभेत येणार आहे. या माध्यमातून शहरातील जास्तीत जास्त महिला लखपती झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा निश्चय करण्यात आला आहे,’ असे नाईक यांनी महिला मेळाव्यात सांगितले.महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून योजनेचा विषय सभागृहात आणून त्याला मंजुरी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई महापालिकेतून या स्वरूपाची विस्तृत योजना प्रथमच सुरू करण्यात येणार असून, देशातील इतर कोणत्याही महापालिकेत अशा प्रकारची योजना नसल्याचा दावाही नाईक यांनी केला.
‘महिलांनी फक्त उत्पादन तयार करायचे आणि ते विकण्यासाठी बाजारपेठ शोधत फिरायचे, अशी परिस्थिती राहू नये. उत्पादनाबरोबर त्याच्या विक्रीची व्यवस्थाही करण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे नाईक यांनी सांगितले. या माध्यमातून नवी मुंबईतील अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन ‘लखपती दीदी’ बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
योजनेमुळे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढण्यासोबतच कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडण्याची अपेक्षा आहे. तसेच महिलांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन शहरी गरिबी कमी करण्यासही मदत होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. आगामी महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते, तसेच किती महिला आणि बचत गटांना त्याचा लाभ मिळतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
६.५० कोटी रुपयांचा निधी
‘लखपती दीदी’ योजनेसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ६ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, सूक्ष्म वित्तीय सहाय्य, उद्योजकता विकास आणि विपणनासाठी मदत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. स्वयं सहाय्यता गटांतील महिलांना वर्षाला किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने विविध उपजीविका प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. उत्पादन तयार करण्यापासून त्याच्या विक्रीपर्यंत महिलांना आवश्यक सहकार्य मिळावे, यावर योजनेत भर राहणार आहे.
