नवी मुंबई: अमेरिका इस्रायल यांनी इराण विरोधात युद्ध छेडल्याने भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा सुरु झाला. सरकारने खबरदारी म्हणून व्यवसायिक गॅस सिलेंडर वर कडक नियम घातले. तर घरगुती गॅस मिळण्यास उशीर होत आहे. याचाच गैरफायदा घेत काळाबाजार सुरु झाला आहे. असाच काळाबाजार मध्ये अव्वाच्या सव्वा किमतीने गॅस सिलेंडरची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्यांच्या कडून १३२ सिलेंडर जप्त केले असून हे सिलेंडर ज्या गाड्यातून वहन केले जात होते त्या चार गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
अमेरिका इस्रायल यांनी इराण विरोधात युद्ध सुरु झाले याला चार आठवडे उलटून गेले आहेत. इराणची सीमा असणाऱ्या समुद्रातून भारत आणि अन्य आशियायी देशांना गॅस पुरवठा करणाऱ्या जहाजांचा एकमेव मार्ग आहे.

मात्र युद्धामुळे या मार्गावर येणाऱ्या जाहनांना इराण लक्ष्य करत असल्याने गॅस आणि इंधन वाहतूक ठप्प झाली आहे. त्यात दोन आठवड्यापासून काही देशांच्या गॅस आणि इंधन वाहतुकीस परवानगी दिली गेल्याने भारतात गॅस पुरवठा थोडा फार होत आहे. देशातील गॅस पुरवठा पूर्ववत होई पर्यंत सरकारने कडक पाऊले उचलली आहेत. व्यवसायिक सिलेंडरला मर्यादा आली असून येत्या काळात ज्या ठिकाणी नैसर्गिक वायू देणे शक्य आहे

त्या ठिकाणी सिलेंडर पुरवठा केला जाणार नाही याचे सूतोवाच केले आहे. एकीकडे सरकार अशा उपायोजना करत असताना जादाचे पैसे मोजले कि सिलेंडर मिळत असल्याने काळाबाजार होत असल्याचे उघड झाले. नवी मुंबईत असा प्रकार उघड झाला असून या प्रकरणी वाशी पोलिसांनी इरफान शेख आणि फिरोज टिटोना या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हि कारवाई १ एप्रिल (मंगळवारी) करण्यात आली. अनधिकृत रित्या सिलेंडर वितरित होत असल्याची माहिती मिळताच जुहू गाव येथील गावदेवी मैदानात पोलिसांनी धाड टाकून संशयित आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्या कडून ८० रिकामे ५२ भरलेले सिलेंडर जप्त केले .गॅस भरलेले सिलेंडरची किंमत २ लाख ३८ हजार ९२२ असून ३४ हजार ४०० रुपयांचे रिकामे सिलेंडर असे एकूण २ लाख ७३ हजार ३२२ रुपयांचे सिलेंडर या व्यवतरिक्त ९ लाख ७० हजार रुपयांच्या चार गाड्या अशा प्रकारे एकूण १२ लाख ४३ हजार ३२२ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोपींच्या विरोधात जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ नुसार गुन्हा नोंद केला आहे. सध्या दोन संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी हि साखळी असू शकते. यात अजून कोणाकोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.