नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असले, तरी या प्रक्रियेमुळे महायुतीतील अंतर्विरोध पुन्हा एकदा उघड झाला आहे. “भाजपने युतीधर्म पाळला नाही,” अशी स्पष्ट भूमिका शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी सभागृहात मांडत, राजकीय नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.
तब्बल सहा वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या सुजाता पाटील यांची महापौरपदी, तर दशरथ भगत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. शिवसेनेने ऐनवेळी दोन्ही पदांसाठीचे नामांकन अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचा मार्ग मोकळा झाला. मात्र, हा निर्णय सहज किंवा सहमतीतून घेतलेला नसून, तो वरिष्ठांच्या आदेशानुसार घेतल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी सभागृहात केला.
महापालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळाला होता. त्याच पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौर निवडणुकीतही दोन्ही पक्षांमध्ये राजकीय चुरस कायम राहिली. शिवसेनेने दोन्ही पदांसाठी भाजप विरोधात उमेदवार उभे करून लढत अद्याप संपली नसल्याचे संकेत दिले होते.
गुरुवारी झालेल्या पहिल्या महासभेच्या सुरुवातीलाच शिवसेना (शिंदे गट) कडून महापौरपदाचा नामांकन अर्ज मागे घेण्यात आला. त्यानंतर उपमहापौर पदासाठीही अर्ज मागे घेण्यात आल्याने दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. मात्र, या निर्णयानंतर सभागृहात शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर युतीधर्म न पाळल्याचा आरोप केला.
महापौर पद बिनविरोध झाल्यानंतर युतीधर्म म्हणून उपमहापौर पदी शिवसेनेच्या उमेदवाराची निवड होईल अशी अपेक्षा शिवसेनेच्या नगरसेवकांनी व्यक्त केली होती. परंतु, उपमहापौर पदासाठी भाजपचे उमेदवार दशरथ भगत यांनी माघार न घेतल्याने शिवसेनेला आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा लागल्याचे शिवसेना गटनेते मनोज हळदणकर यांनी सांगितले.
एकीकडे भाजपने नवी मुंबईत पहिल्यांदाच एकहाती सत्ता प्रस्थापित केली असली, तरी दुसरीकडे महायुतीतील समन्वय आणि परस्पर विश्वास याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवरील हे तणाव भविष्यातील महापालिकेच्या राजकारणावर काय परिणाम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आदेश म्हणून युतीधर्म पाळला…
राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुतीचा भाग असले, तरी नवी मुंबईत स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमधील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महापालिका निवडणुकीत एकमेकांवर घणाघाती आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतरही, युतीधर्म म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे शिवसेनेचे गटनेते मनोज हळदणकर यांनी सांगितले. भाजपने युतीधर्म पाळला नाही, तरी वरिष्ठांचा आदेश म्हणून आम्ही युतीधर्म पाळत आहोत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी सभागृहात मांडली.

