नवी मुंबई : नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील आता अॅक्शन मोडवर आल्या आहेत. नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील यांनी मंगळवारी शहरातील महापालिका रुग्णालयांना अचानक भेटी देत आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, औषधसाठा, स्वच्छता आणि वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. काही ठिकाणी आढळलेल्या त्रुटींवर तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
महापौर सुजाता पाटील यांनी पदभार स्वीकारते वेळीच शहरातील आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी शहरातील रुग्णालये आणि त्यामाध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी महापौरांनी अचानकपणे बेलापूर येथील माता बाल रुग्णालय तसेच नेरुळ आणि ऐरोलीतील महापालिका रुग्णालयाला भेट दिली.
यावेळी महापौरांनी गर्भवती महिलांसाठी विशेष सुविधा पुरवण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी सांगितले की, नागरिकांना घराजवळच उपचार मिळावेत यासाठी ‘कंटेनर दवाखाना’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून विविध भागांमध्ये जाऊन प्राथमिक आरोग्य तपासणी, औषध वितरण आणि लहान आजारांवरील उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच दुर्गम भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यासोबतच महापालिका आणि शहरातील खाजगी रुग्णालयांना एका एकत्रित ‘डॅशबोर्ड’ प्रणालीद्वारे जोडण्याची योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रणालीमुळे रुग्णालयातील उपलब्ध खाटा, अतिदक्षता विभागातील सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता आणि इतर महत्त्वाची माहिती तत्काळ मिळू शकेल. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना योग्य रुग्णालयात त्वरीत हलविण्यास ही यंत्रणा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागरिकांना अधिक परिणामकारक आणि सुलभ आरोग्य सेवा देणे हेच महापालिकेचे उद्दिष्ट असून, त्यासाठी प्रशासन ‘अॅक्शन मोड’मध्ये काम करत असल्याचे महापौरांनी आपल्या अचानक केलेल्या दौऱ्यातून नमूद केले. शहरातील इतर समस्या सोडवण्याबाबतही महापौर सुजाता पाटील अशाच प्रकारे सतर्क राहून तत्परतेने नागरिकांची कामे करतील असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

