नवी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात २८ ते ३० जानेवारीदरम्यान तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू झाली होती. मात्र, महापौर पदाची निवड पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार म्हणजेच ५ फेब्रुवारी रोजी होणार असून, यात तूर्तास तरी कोणताही बदल संभवत नसल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार शासकीय दुखवट्याच्या काळात शासकीय इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविण्यात येणार असून कोणतेही मनोरंजनात्मक अथवा जाहीर कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. त्यामुळे महापौरांची निवड नियोजित वेळेत होईल की, पुढे ढकलली जाईल याबाबत राजकीय वर्तुळातून साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र महापालिका प्रशासनाने निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल नसल्याचे स्पष्ट केले आहे.

महापौर पदाच्या निवडीसाठी ५ फेब्रुवारी रोजी विशेष महासभेचे आयोजन करण्यात येणार असून, त्याच दिवशी नवी मुंबईच्या नव्या महापौरांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपचे ६५ नगरसेवक निवडून आले असून, नव्याने समाविष्ट १४ गाव परिसरातील अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ ६६ झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर निवडून येणे जवळपास निश्चित मानले जात आहे. यंदाचे महापौर पद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असल्याने महिला उमेदवारांपैकी कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळासह नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णय ५ फेब्रुवारीच्या विशेष महासभेत होणार आहे.

महापौर पदासाठीचे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख १ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर करण्यात आलेला शासकीय दुखवटा संपल्यानंतर ३१ जानेवारीपासून महापालिकेचे कामकाज पूर्ववत होईल. त्यामुळे महापौर पदाच्या निवडीच्या कार्यक्रमात तूर्तास तरी कोणताही बदल संभवत नाही. – डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका