नवी मुंबई : महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने आयोजित या उपक्रमात शहरातील २६ गावांतील गावठाण क्षेत्रांसह महापालिकेच्या पाच रुग्णालयांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. सुमारे ३५०० हून अधिक नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवित १० हजार ८८५ किलो कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावली, तर ११८.४५ किलोमीटर परिसर स्वच्छ करण्यात आला.
नवी मुंबईला स्वच्छतेबाबत राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मानांकने प्राप्त झाली असून, ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष श्रेणीत शहराचा समावेश आहे. या यशामध्ये नागरिकांचा आणि सामाजिक संस्थांचा सातत्यपूर्ण सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. प्रतिष्ठानमार्फत नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमांमुळे गावठाण परिसरातील साचलेला कचरा, प्लास्टिक, झुडपे आणि अनधिकृत टाकाऊ वस्तू हटविण्यात आल्या. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला व मोकळ्या जागांमध्ये साचलेला घनकचरा उचलण्यात आला.
या उपक्रमात प्रतिष्ठानचे २७१० श्रीसदस्य सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत महापौर सौ. सुजाता सुरज पाटील, उपमहापौर दशरथ भगत, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, नगरसेवक निशांत भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे तसेच स्वच्छता अधिकारी, निरीक्षक, कर्मचारी आणि स्वच्छताकर्मी सहभागी झाले. कुकशेत गाव तसेच वाशीगाव येथे लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष श्रमदान करून मोहिमेत सहभाग घेतला.
रुग्णालय परिसरात विशेष लक्ष देत स्वच्छता करण्यात आली. रुग्ण, नातेवाईक आणि येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी परिसरातील कचरा, गवत आणि अनावश्यक साचलेला कचरा हटविण्यात आला.
जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या मोहिमेतून ‘स्वच्छता हीच सेवा’ हा संदेश अधोरेखित झाला. सामूहिक प्रयत्नांतून गावठाण भाग अधिक स्वच्छ आणि नीटनेटके झाले असून, स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. शहराच्या स्वच्छतेचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले.
