जमीन संपादनाचा प्रश्न, अतिशय संथ गतीने सुरू असलेले काम, तळोजा पाचनंद पुलाचे किचकट काम आणि मेट्रो स्थानक उभारणीसाठी नव्याने काढाव्या लागलेल्या निविदा या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईत जुलै २०१८ पर्यंत मेट्रो सुरू होण्याची शक्यता धूसर आहे. हा मार्ग जुलै २०१८ पर्यत सुरू होईल, अशी घोषणा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अभिभाषणात केली असली, तरीही तसे होण्याची चिन्हे नाहीत.
लोकसंख्येने झपाटय़ाने वाढणाऱ्या नवी मुंबईत मेट्रो सारखी जलद व सुखकारक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी मे २०११ मध्ये बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यात आले. हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे, त्यामुळे हा मार्ग जुलै २०१८ पर्यंत सुरू होण्याची शक्यता अतिशय कमी असल्याचे सिडकोतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय माजी व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गिल यांनी घेतला आणि त्याला गती देण्याचे काम तानाजी सत्रे यांनी केले. मे २०११ मध्ये खारघर येथे या कामाचा आरंभ तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ही सेवा तीन वर्षांत सुरू करण्याचे आश्वासन सिडकोच्या वतीने शासनाला देण्यात आले होते, मात्र सहा वर्षे लोटल्यानंतही ही सेवा सुरू झालेली नाही. जमीन संपादन व आर्थिक विवंचना सिडकोसमोर नव्हती त्यामुळे तीन वर्षांत नवी मुंबई मेट्रो सुरू करण्यात कोणतीही अडचण नव्हती, मात्र माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी विमानतळाकडे लक्ष केंद्रित केले, त्यामुळे मेट्रोचे काम काहीसे मागे पडले.
मेट्रो सेवेत व्हायाडक्ट, स्टेशन, डेपो आणि सिग्नलिंग व टेली कम्युनिकेशन ही चार कामे महत्त्वाची मानली जातात. त्यानंतरच तिकीट वगैरेसारखी कामे हाती घेता येतात. नवी मुंबई मेट्रोच्या व्हायाडक्टचे काम सध्या ९५ टक्के पूर्ण झाले आहे, पण या मार्गात तळोजा-पाचनंद येथे कोकण रेल्वे मार्गावर बांधण्यात येणारा उड्डाणपूल हे एक मोठे आव्हान आहे. या उड्डाणपुलाला परवानगी देण्यातच रेल्वेने दोन वर्षे घालवली आहेत. आता त्याला परवानगी मिळाली आहे, पण हा पूल कोणत्याही खांबाशिवाय (स्टे केबल ब्रिज) उभारला जाणार आहे. उड्डाणपूल ७०० मीटरपेक्षा लांब आहे. हा उड्डाणपूल बांधण्यास दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. यात १० मेट्रो स्थानके बांधण्याचे काम ज्या कंत्राटदराला देण्यात आले होते त्याने या बांधकामाला इतका उशिरा लावला की सिडकोला हे काम रद्द करून नव्याने निविदा मागविण्याची वेळ आली. त्यामुळे अद्याप स्टेशनच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही.
अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सिग्नलिंग अॅण्ड टेलिकम्युनिकेशनचे कामही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दीड वर्षांत ही सेवा सुरू होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. तीन वर्षांत सुरू होणारी ही सेवा सहा वर्षे झाली तरी सुरू न झाल्याने जुलै २०१८ची मुदतही टळण्याचीच चिन्हे अधिक आहेत.
विलंबाची कारणे
- तळोजा-पाचनंद येथे कोकण रेल्वे मार्गावर कोणत्याही खांबाशिवाय उड्डाणपूल (स्टे केबल ब्रिज) उभारला जाणार आहे. हा उड्डाणपूल बांधण्यास दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.
- स्थानके बांधण्याचे काम ज्या कंत्राटदराला दिले होते, त्याने विलंब केल्याने सिडकोला नव्याने निविदा मागवाव्या लागल्या आहेत.
- सिग्नलिंग अॅण्ड टेलिकम्युनिकेशनचे काम संथगतीने सुरू आहे.
