नवी मुंबई : नवी मुंबईसारख्या नियोजित व तुलनेने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. १ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४९९ मुले-मुली बेपत्ता झाल्याची नोंद नवी मुंबई पोलिसांनी केली आहे. यात ३४९ मुली व १५० मुलांचा समावेश आहे. यापैकी ४५८ जणांचा शोध लागला असला, तरी ४१ जणांचा शोध अद्यापही सुरू असून यात सर्वाधिक म्हणजेच ३४ मुलींचा समावेश आहे. या प्रकरणांमुळे मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

बेपत्ता झालेल्या मुला-मुलींच्या वयोगटावर नजर टाकल्यास यात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. बदलती जीवनशैली, डिजिटल जगाचे वाढते आकर्षण आणि कुटुंबातील संवादाचा अभाव ही कारणे या घटनांना चालना देत असल्याचे घोरपडे यांनी सांगितले आहे. “बहुतेक मुली सुरक्षितरीत्या सापडतात; मात्र सुरुवातीचे काही तास तपासात अत्यंत महत्त्वाचे असतात,” असेही त्यांनी नमूद केले आहे.

बहुतांश प्रकरणांत मुलांना शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी ४१ मुला-मुलींचे शोध अद्याप लागलेले नाहीत, ही चिंताजनक बाब कायम आहे. तसेच, यातील २५ गुन्हे पोक्सो अंतर्गत नोंद असल्याने चिंता अधिक वाढली आहे. या प्रकरणांच्या तपासात तांत्रिक साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

पालकांसाठी पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे. मुलांच्या दैनंदिन वर्तनातील बदल, त्यांचे ऑनलाइन व्यवहार, अनोळखी व्यक्तींसोबतचे संवाद याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले जात आहे. शाळा-­महाविद्यालयांमध्येही जनजागृती केली जात आहे. – पृथ्वीराज घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष

बेपत्ता मुला-मुलींच्या नोंदी

१ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांतून बेपत्ता मुला-मुलींच्या नोंदींमध्ये सर्वाधिक आकडे तुर्भे पोलीस ठाण्यातील (५१) आहेत. त्यापाठोपाठ रबाळे (४९), रबाळे एमआयडीसी (४१), पनवेल शहर (३९), खारघर (३३), तळोजा (३१), कोपरखैरणे (३२), एनआरआय (३०) यांशिवाय कामोठे (२२), खांदेश्वर (२०), नेरुळ (१८), एपीएमसी (१९) या भागांसह इतर भागातीही लक्षणीय प्रकरणे नोंदली गेली आहेत.

बेपत्ता झाल्याची कारणे आणि सापडलेल्या मुला-मुलींची संख्या

पालक रागावल्याने घर सोडणे – ११४

प्रेमसंबंध – १२८

नातेवाईकांकडे गेल्या पण कळवले नाही – १०३

फिरायला गेले पण परत न आल्याने नोंद – ६३

मैत्रिणीकडे गेल्याने घरातून बाहेर पडणे – ४८

मतिमंद / मानसिक स्थितीमुळे भटकंती – १

एडीआर (अकस्मात बेपत्ता) – १

एकूण शोधली गेलेली मुले-मुली – ४५८