नवी मुंबई : महापालिकेकडून वारंवार आवाहन तसेच अभय योजना सुरू करूनदेखील काही मालमत्ताधारक कर भरण्यास दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अशा बड्या मालमत्ता थकबाकीदारांसमोर ढोल वाजवून त्यांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्याची सुरुवात सोमवार २० मार्चपासून करण्यात आली आहे. पालिकेची सानपाडा येथील फुल स्टॉप मॉलमधील दुकानांकडे २०-२१ कोटींची थकबाकी असून, १५ जणांवर कारवाई करण्याचे पालिकेचे नियोजन होते. परंतु, त्यापैकी काहींनी ५० लाख रक्कम दिल्याने त्यांच्यावर तुर्तास कारवाई केली नाही. परंतु, ८ जणांवर कारवाई करून युनिट सील करण्यात आले आहे. आठ जणांकडे ६ कोटी ६६ लाख थकबाकी आहे. नवी मुंबई महानगर पालिकेत मालमत्ताकर हा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे. मात्र नवी मुंबई शहरात आजही मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी आहे. करोना काळात ही थकबाकी अधिक झाली होती. त्यामुळे करोनाच्या कालावधीत नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मालमत्ताकर थकबाकीदारांकरिता अभय योजना लागू करण्यात आली होती. मात्र अभय योजना लागू करूनदेखील काही थकबाकीदारांनी कर भरण्यास पाठ फिरवली आहे. त्यामुळे अशा मोठ्या रक्कमेची थकबाकी असणाऱ्यांवार पालिकेने कर वसुलीसाठी लक्ष केंद्रित केले, त्यांना नोटिस बजावल्या आहेत. मात्र नोटिस बजावूनदेखील कर भरण्यास दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे अशा थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी महापालिकेने नामी शक्कल लढवली आहे. थकबाकीदारांसमोर ढोल वाजवून त्यांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रवृत्त केले आहे. हेही वाचा - नवी मुंबई : पावसाने पालेभाज्या खराब; मेथी, कोथिंबीरला अधिक फटका हेही वाचा - ‘बदलापूर’ सिनेमाची आठवण करून देणारी घटना नेरुळमध्ये, तब्बल २५ वर्षांनी उगवला सूड, वाचा नेमकं काय घडलं.. मोठे थकबाकीदार यांच्याकडून कर वसुली करण्यासाठी ढोल बजाव मोहीम राबविण्यात येत आहे. सानपाडा येथील फुल स्टॉप मॉलपासून सुरुवात करण्यात आली असून त्या ठिकाणाहून २०-२१ कोटी येणे आहे. त्यापैकी ४-५जणांनी ५० लाख भरल्याने तुर्तास त्यांच्यावर कारवाई केली नाही. परंतु, ८ जणांवर कारवाई करून त्यांचे युनीट सील करण्यात आले आहे, असे नवी मुंबई महानगरपालिकेचे वसुली अधिकारी दत्तात्रय काळे म्हणाले.