नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सरळसेवा भरती २०२५-२६ अंतर्गत ऑनलाइन स्पर्धा परीक्षेला मंगळवारी सुरुवात झाली. राज्यातील सहा जिल्ह्यांतील १३ परीक्षा केंद्रांवर तीन सत्रांमध्ये पहिल्या दिवसाची परीक्षा कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय सुरळीत पार पडल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. पहिल्या दिवशी एकूण ८,१७७ उमेदवारांनी परीक्षा दिली असून उर्वरित परीक्षा बुधवारी दोन सत्रांत होणार आहे.

महापालिकेच्या सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत सहा संवर्गांतील ३६ पदांसाठी ही ऑनलाइन स्पर्धा परीक्षा घेतली जात आहे. या पदांसाठी १८,९३० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षा प्रक्रियेचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी देखरेख राहावी यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वर्ग-एक अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून, तर १३ अधिकाऱ्यांची केंद्र निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी संबंधित जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांना भेट देऊन व्यवस्था, तांत्रिक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

पेपर फुटी किंवा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच केंद्र सरकारच्या सुरक्षा विभागाच्या मान्यतेने सर्व परीक्षा कक्षांमध्ये मोबाईल जॅमर बसविण्यात आले होते. त्यामुळे परीक्षा केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

मंगळवारी सकाळी नऊ वाजता सर्व १३ केंद्रांवर नियोजित वेळेनुसार पहिल्या सत्राला सुरुवात झाली. सकाळी ९ ते ११ या सत्रात २,४४२, दुपारी १ ते ३ या सत्रात २,७२७, तर सायंकाळी ५ ते ७ या सत्रात ३,००८ उमेदवारांनी परीक्षा दिली. अशा प्रकारे पहिल्या दिवशी तीनही सत्रांमध्ये मिळून ८,१७७ उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले.

महापालिका प्रशासनाने बुधवारच्या उर्वरित दोन सत्रांसाठीही अशीच काटेकोर व्यवस्था केल्याचे सांगितले आहे. प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, अन्यथा नियमानुसार परीक्षेस बसता येणार नाही, असा इशारा उमेदवारांना देण्यात आला आहे.

दरम्यान, भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होत असल्याचा पुनरुच्चार प्रशासनाने केला आहे. नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली कोणीही पैशांची मागणी करत असल्यास किंवा कोणतेही आमिष दाखवत असल्यास त्याबाबत तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी, तसेच भरतीविषयक अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ आणि अधिकृत समाजमाध्यमांवरील माहितीलाच ग्राह्य धरावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.