नवी मुंबई – विविध खेळांमधील प्रावीण्यप्राप्त नवी मुंबईकर क्रीडापटूंना आपली अंगभूत गुणवत्ता सिद्ध करता यावी, तसेच त्यांना जिल्हा व राज्यातील उत्तम खेळाडूंचा खेळ अनुभवता यावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. नागरिकांना उत्सुकता असलेल्या महत्वाच्या अशा कुस्तीसारख्या देशी खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने २५ व २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सेक्टर ७ कोपरखैरणे येथे डी मार्टच्या मागे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७६ व १०५ या शाळेच्या मैदानावर ‘नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
शनिवार २५ फेब्रुवारी सायंकाळी ४ वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून, रविवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ७.३० वा. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर ७४ ते १०० किलो वजनी गटाकरिता १ लाख रकमेचे प्रथम पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. त्याचप्रमाणे अनुक्रमे ६० हजार, ४० हजार व ३० हजार अशा रकमेची द्वितीय, तृतीय व चतुर्थ पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. ५५ ते ६५ किलो राज्यस्तरीय वजनी गटात प्रथम क्रमांक रु. २१ हजार, तसेच द्वितीय क्रमांक रु. ११ हजार, तृतीय क्रमांक रु. ७ हजार आणि चतुर्थ क्रमांक रुपये ५ हजार अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.
हेही वाचा – रागाच्या भरात महिलेची हत्या, पोलिसांनी आरोपीला नेपाळ-भारत सीमेवर केली अटक
राज्यस्तरीय ६५ ते ७३ किलो वजनी गटात रुपये २५ हजार रकमेचे पहिले पारितोषिक आणि रु. ११ हजार, रु. ७ हजार व रु. ५ हजार अशा रकमेची द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिके असणार आहेत. तसेच ५५ ते ६० किलो कोकण विभागीय स्तर गटात रुपये ११ हजार रकमेचे प्रथम, ७ हजार रकमेचे द्वितीय, ५ हजार रकमेचे तृतीय आणि रु. ३ हजार रकमेचे चतुर्थ पारितोषिक प्रदान केले जाणार. ५५ ते ६५ किलो नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र स्तर वजनी गटात रु. ११ हजार प्रथम, रु. ७ हजार द्वितीय, रु. ५ हजार तृतीय व रु. हजार अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. ४० ते ५० किलो वजनी गटात नमुंमपा क्षेत्र स्तरावर रु. ५ हजार, रु. ३ हजार, रु. २ हजार व रु. १ हजार अशी पारितोषिके वितरित केली जाणार आहेत.
महिलांसाठीदेखील विशेष कुस्ती स्पर्धा होत असून, त्यामध्ये ५५ ते ६५ किलो महिला वजनी गटात राज्यस्तरीय स्पर्धेत रुपये ११ हजार रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक रु. ७ हजार, तृतीय पारितोषिक रु. ५ हजार व चतुर्थ पारितोषिक रुपये ३ हजार प्रदान केले जाणार आहे. महिला गटामध्ये कोकण विभागीय स्तरावरील ५० ते ५५ किलो वजनी गटात रु. ७ हजार प्रथम, रु. ५ हजार द्वितीय, रु. ३ हजार तृतीय आणि रु. २ हजार चतुर्थ रक्कमेचे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : क्षुल्लक कारणावरून हत्या, आरोपीला अटक
नवी मुंबईतील कुस्तीगिरांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होऊन आपल्या क्रीडा गुणांना उपलब्ध करून दिलेल्या हक्काच्या व्यासपीठाचा उपयोग करून घ्यावा, तसेच कुस्तीप्रेमींनीही याप्रसंगी उपस्थित राहून राज्यातील नामांकित कुस्तीगिरांच्या खेळाचा थरार अनुभवावा, असे क्रीडा व सास्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे म्हणाले.