नवी मुंबई: नवी मुंबईत मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून रोज किमान २० ते २५ मोबाईल चोरीच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिक सतर्कता बाळगत असताना आता मोबाईल चोरीसाठी ऍसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाणे अंतर्गत घडला आहे. या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस संशयित आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
नवी मुंबईत मोबाईल चोऱ्या प्रचंड वाढल्या आहेत. बस मध्ये चढताना, मोबाईल वर बोलत बोलत रस्त्याने जात असताना, घरफोडी करून, उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून एकाच वेळी घरातील सर्व सदस्याचे केवळ मोबाईल चोरी करणे, प्रवासात बॅगेतील मोबाईल काढून घेणे अशा अनेक प्रकारे क्लृप्ती वापरात मोबाईल चोरटे हात साफ करतात.
त्यात गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत केवळ सीईआयआर (Central Equipment Identity Register) या पोर्टलवर नोंद करून घेण्याकडे त्यांचा कल असतो. फार क्वचित मोबाईल चोरीची गुन्हा म्हणून नोंद होते. याच कारणाने एकूण मोबाईल चोरी किती झाले याची आकडेवारी मिळत नाही.
आता त्याहून धक्कादायक प्रकार समोर आला असून मोबाईल व चीज वस्तू चोरण्यासाठी दोन जणांनी एका व्यक्तीच्या अंगावर ऍसिड फेकले. त्यात तो तडफत असताना त्याच्या कडील मोबाईल , चार हजाराची रोख रक्कम आधारकार्ड असे एकूण सात हजराचा ऐवज चोरी करून दोन्ही चोरटे पळून गेले. तैय्यब खान हे कोपरखैरणे नोड मधील बोनकोडे गावात राहतात. चार तारखेला रात्री पावणे नऊच्या सुमारास याच परिसरातील नाल्या शेजारील रस्त्यावरून ते पायी जात होते.
सार्वजनिक स्वच्छता ग्रह समोर आले असता विरूद्ध दिशेने एका दुचाकीवर दोघे जण आले. त्यांनी एक काचेची बाटली बाहेर काढून त्यातील द्रव खान याच्या अंगावर फेकले. हे द्रव त्याच्या चेहऱ्यावर हातावर पोटावर पडल्याने तो भाग भाजला. तो जिवाच्या आकांताने ओरडत असताना चोरट्यांनी कुठलीही दयामाया न दाखवता त्याच्या कडील मोबाईल आणि खिशातील पैशांचे पाकीट जबरदस्तीने घेत पोबारा केला. हि घटना अवघ्या काही मिनिटात घडली.
याबाबत अधिक माहिती देताना कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांनी सांगितले कि स्वच्छता गृह स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात आलेले ते ऍसिड होते. मात्र त्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस त्या दोन संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

