नवी मुंबई : मोरबे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोरबे धरणात सध्या ३६.४७० दशलक्ष घनमीटर म्हणजेच केवळ १९.११ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा कालावधी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगत प्रशासनाने नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले आहे.
उन्हाळ्यात वाढलेली मागणी आणि कमी होत जाणारा साठा यामुळे पुढील काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पाणीकपात लागू करून उपलब्ध पाण्याचे वितरण नियोजनबद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेने नागरिकांना पाणी वापरात काटकसर करण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे. घरगुती वापरात नळ सतत सुरू ठेवू नयेत, दैनंदिन कामांसाठी बादलीचा वापर करावा, आंघोळीसाठी शॉवरऐवजी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा, तसेच वॉशिंग मशीनचा वापर शक्यतो एकत्रित कपड्यांसाठी मर्यादित ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणाऱ्या नोझल्सचा वापर केल्यास घरगुती पातळीवर मोठ्या प्रमाणात पाणी बचत होऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
व्यावसायिक आस्थापनांनाही पाणी बचतीबाबत विशेष निर्देश देण्यात आले आहेत. हॉटेल्स आणि उपहारगृहांनी ग्राहकांना विनाकारण पाण्याचे ग्लास देण्याऐवजी मागणीनुसारच पाणी द्यावे, तसेच पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होणाऱ्या सर्व आस्थापनांनी आधुनिक पाणी बचत पद्धती स्वीकाराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर पूर्णपणे टाळावा, तसेच बांधकाम कामांमध्येही पिण्याचे पाणी वापरू नये, असे स्पष्ट निर्देश महापालिकेने दिले आहेत. यासोबतच गृहनिर्माण संस्थांनी आपल्या इमारतीतील जलवाहिन्यांची तपासणी करून गळती तातडीने दुरुस्त करावी, तसेच पाण्याच्या टाक्या भरताना ओव्हरफ्लो होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना आवाहन
पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वापर करणे गरजेचे असल्याचे सांगत महापालिकेने पाणी बचत मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आगामी पावसाळ्यापर्यंत परिस्थिती सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग निर्णायक ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
