नवी मुंबई : हिमालयातील आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या उच्च-उंचीच्या गिर्यारोहण मोहिमांपैकी एक असलेल्या ‘फ्रेंडशिप पीक’ शिखरावर नवी मुंबईतील गिर्यारोहक उत्तम डे यांनी यशस्वी चढाई करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. समुद्रसपाटीपासून ५,२८९ मीटर (१७,३५३ फूट) उंचीवर असलेल्या या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी हिमभेगा, बर्फाच्छादित उतार आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत दहा तासांची खडतर चढाई पूर्ण केली.

हिमाचल प्रदेशातील पिर पंजाल पर्वतरांगेत वसलेले फ्रेंडशिप पीक हे उच्च-उंचीच्या गिर्यारोहणासाठी महत्त्वाचे शिखर मानले जाते. मनाली परिसरातून सुरू झालेल्या या मोहिमेत सोलंग व्हॅली, अल्पाइन कुरणे, मोरेन प्रदेश आणि हिमनद्यांनी व्यापलेल्या भूभागातून मार्गक्रमण करण्यात आले. मोहिमेच्या नियोजनानुसार लोहाली, लेडी लेग आणि समिट कॅम्प येथे टप्प्याटप्प्याने तळ उभारण्यात आले.

रात्रभराची चढाई, पहाटे शिखर सर

शिखराकडे जाणारा अंतिम टप्पा सर्वाधिक धोकादायक मानला जातो. कोलच्या पुढील भागात हिमभेगा आणि हिमस्खलनाचा धोका असल्याने ९ जून रोजी रात्री ११ वाजता अंतिम चढाई सुरू करण्यात आली. कमी तापमान आणि तुलनेने स्थिर बर्फाचा फायदा घेण्यासाठी गिर्यारोहकांना रात्रभर प्रवास करावा लागतो.

सुमारे दहा तासांच्या चढाईनंतर उत्तम डे यांनी १० जून रोजी सकाळी ६.०५ वाजता फ्रेंडशिप पीकचे शिखर गाठले. पहाटेच्या अनुकूल हवामानामुळे सूर्याची तीव्रता वाढण्यापूर्वी सुरक्षितपणे उतरणेही शक्य झाले. शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांनी भारतीय तिरंगा फडकावत मोहिमेचे यश साजरे केले.

उंची नव्हे, जिद्द महत्त्वाची

या यशानंतर प्रतिक्रिया देताना उत्तम डे यांनी गिर्यारोहण हे केवळ शारीरिक क्षमतेचे नव्हे, तर मानसिक ताकद आणि सातत्याची परीक्षा असल्याचे सांगितले. पर्वत माणसाला नम्रता, संयम आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची प्रेरणा देतात, असे ते म्हणाले. स्वतःची उंची अवघी पाच फूट असल्याने अनेकदा लोकांकडून कमी लेखले गेल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला.

मात्र पर्वतांनीच स्वतःवर विश्वास ठेवण्याची शिकवण दिली, असे त्यांनी नमूद केले. “उंचीने लहान असणे महत्त्वाचे नसते. मोठी स्वप्ने पाहण्याची तयारी आणि कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची जिद्द अधिक महत्त्वाची असते,” असा संदेश त्यांनी तरुणांना दिला. नवी मुंबईतील गिर्यारोहकांनी गेल्या काही वर्षांत हिमालयातील विविध मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यात आता उत्तम डे यांच्या फ्रेंडशिप पीक सर करण्याच्या कामगिरीची भर पडली असून, साहसी क्रीडा क्षेत्राकडे वळणाऱ्या तरुणांसाठी ही मोहीम प्रेरणादायी ठरत आहे.