नवी मुंबई : मुंबई महानगरात प्रवेश करणाऱ्या छोट्या वाहनांना पथकरमुक्ती देऊन रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या उड्डाणपूल आणि लगतच्या रस्त्यांचा भार महापालिकांवर सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शीव-पनवेल महामार्गावरील तीन मोठया उड्डाणपूलांच्या बांधणी, दुरुस्तीचा ७५ कोटी रुपयांचा अतिरीक्त भार नवी मुंबई महापालिकेवर पडणार आहे. हा भार लक्षात घेऊन महापालिकेने उड्डाणपुलांवरील जाहीरातींचे हक्क मिळावेत यासंबंधीचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठविला आहे. जाहीरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून उड्डाणपुलांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करणे सोयीचे होईल असे प्रशासनाचे मत आहे.
रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित येणारे शीव-पनवेल महामार्गावरील तीन वाशी, नेरुळ आणि सीबीडी येथील तीन उड्डाणपूल नवी मुंबई हद्दीत मोडतात. तुर्भे येथील मोठे उड्डाणपूलांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मुंबई महानगर प्रदेशातील प्रवेशद्वारांवरील वाशी, मुलुंड, ऐरोली आणि दहिसर या पाच टोलनाक्यांवरील टोल वसुली राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांपुर्वी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. ही टोल वसुली बंद केल्यामुळे मुंबईतील २७ उड्डाणपूल तसेच टोलनाक्यांलगत असलेल्या महापालिकांच्या हद्दीत येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती कोणी करायची असा मुद्दा पुढे आला.
पुरेशा देखभाल, दुरुस्ती अभावी या उड्डाणपूलांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजीचा सुर आहे. हे लक्षात घेऊन हे उड्डाणपूल मुंबई महानगर प्रदेशातील महापालिकांच्या ताब्यात द्यायचे असा निर्णय राज्य सरकारने वर्षभरापुर्वी घेतला. त्यानुसार उड्डाणपुलांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सध्या सुरु आहे. असे असले तरी पथकरमुक्तीचा मोठा भुर्दड आता नवी मुंबईसारख्या महापालिकेवर पडणार आहे. महापालिका हद्दीतील तीन उड्डाणपुलांच्या देखभालीवर महापालिकेस ७५ कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. या उड्डाणपुलांची संरचनात्मक दुरुस्ती, कॅाक्रिटीकरण, डांबरीकरण तसेच इतर कामांचा यामध्ये समावेश आहे.
जाहीरात हक्कांसाठी आग्रह
मुंबई महानगर प्रदेशात मुंबईचा अपवाद वगळला तर इतर महापालिकांच्या तुलनेत नवी मुंबई ही आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी महापालिका आहे. शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलांच्या दुरुस्तीवर ७५ कोटी रुपये खर्च करणे हे महापालिकेच्या आवाक्याबाहेर नसले तरी नव्या आर्थिक वर्षात यासाठी स्वतंत्र्य तरतूद करण्यात आलेली नाही. असे असले तरी महापालिकेने मध्यंतरी या उड्डाणपुलांवरील जाहीरातींचे हक्क मिळावेत अशास्वरुपाचा एक प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाकडे पाठविला होता.
या जाहीरात हक्कांच्या बदल्यात उड्डाणपूल हस्तांतरित करुन घेण्यास महापालिकेने यापुर्वीच तयारी दाखवली होती. राज्य सरकारने हस्तांतरणाचा आग्रह धरताच महापालिकेने पुन्हा एकदा या पुलांवरील जाहीरातींचे हक्क मिळावेत अशास्वरुपाचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाकडे पाठविला आहे. हे अधिकार मिळाल्यास उड्डाणपुलांच्या नियमीत देखभालीवर होणारा खर्च त्यातून वसूल होऊ शकतो, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सुत्रांनी लोकसत्ताला दिली.
शीव-पनवेल महामार्गाची दुरावस्थेचा मोठा फटका नवी मुंबई महापालिका हद्दीतील नागरिकांना बसत असतो. त्यामुळे हा महामार्ग तसेच त्यावरील उड्डाणपूल महापालिकेला हस्तांतरित केले जावेत अशास्वरुपाचा ठराव आम्ही यापुर्वीच केला आहे. मात्र हे करत असताना या महामार्गावरील जाहीरातींचे हक्क महापालिकेला मिळायला हवेत. तरच हे हस्तांतरण न्याय असेल असे आमचे मत आहे. सागर नाईक, सभागृह नेते नवी मुंबई महापालिका
