नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक (नामनिर्देशित सदस्य) पदांसाठीची चुरस अद्याप कायम आहे. महापालिकेत एकूण १० स्वीकृत नगरसेवक नियुक्त होणार असून, पक्षनिहाय संख्याबळानुसार भाजपला ६ तर शिवसेनेला (शिंदे गट) ४ सदस्य मिळण्याची शक्यता आहे. या पदांमधून सभागृहात प्रभावी भूमिका बजावण्याची संधी मिळत असल्याने इच्छुकांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी काही प्रभागांत अपेक्षित यश न मिळाल्याने स्वीकृत नगरसेवकपदाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत पराभूत झालेले, मात्र संघटनात्मकदृष्ट्या सक्रिय आणि पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते या माध्यमातून सभागृहात स्थान मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र केवळ पराभूत उमेदवारांनाच संधी दिल्यास संघटनेत नाराजी पसरण्याची शक्यता असल्याची चर्चा पक्षांर्गत सुरू आहे.

शिवसेनेतही (शिंदे गट) परिस्थिती वेगळी नाही. निवडणुकीतील यशाच्या जोरावर स्वीकृत नगरसेवकपदाच्या माध्यमातून अनुभवी आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेले चेहरे पुढे आणण्याचा विचार पक्षाकडून सुरू आहे. विशेषतः झोपडपट्टी, नागरी सुविधा आणि पुनर्विकासाशी संबंधित प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेऊ शकतील अशा व्यक्तींना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या पहिल्या विशेष महासभेतील गोंधळामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांबाबतचा निर्णय लांबला असला, तरी या पदांसाठीची राजकीय धावपळ अधिकच तीव्र झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

मत मांडण्याची संधी

स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसला, तरी सभागृहातील चर्चा, समित्यांमधील सहभाग आणि धोरणात्मक मुद्द्यांवर मत मांडण्याची संधी मिळते. त्यामुळे ही पदे औपचारिक न राहता महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये महत्त्वाची ठरणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेतील प्रमुख आकडेवारी

एकूण निवडून आलेले नगरसेवक : १११

स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवक : १०

पक्षनिहाय संख्याबळ : भाजप ६५ ( १ अपक्ष), शिवसेना (शिंदे) ४२, शिवसेना (उबाठा) २, मनसे १ स्थायी समिती सदस्य संख्या : १६