scorecardresearch

अर्थसंकल्प मागील पानावरून पुढे..

गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेत प्रशासकीय सत्ता आहे.

नवी मुंबई महापालिकेचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर नव्या घोषणांऐवजी जुन्या प्रकल्पांच्या पूर्तीवर भर उत्पन्नाचे दावे मात्र कोडय़ात पाडणारे

नवी मुंबई : महापालिकेची निवडणूक अवघ्या दोन-तीन महिन्यांवर आली असताना राजकीय दबावापोटी नव्या प्रकल्पांची, घोषणांची जंत्री न मांडता आधीच्या प्रकल्पांच्या पूर्णत्वावर भर देणारा २०२२-२३चा अर्थसंकल्प नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी मांडला. अपेक्षेप्रमाणे नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादण्यात आलेली नाही. मात्र, १.८० कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी दाखवलेले उत्पन्नाचे आकडे अवास्तव असल्याचे वरकरणी दिसत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेत प्रशासकीय सत्ता आहे. पालिकेची सूत्रे बऱ्याच महिन्यांपासून अभिजित बांगर यांच्याकडे आहे. बांगर यांनी गेल्या वर्षीही अर्थसंकल्प सादर करताना नवीन घोषणा करण्याचे टाळले होते. मात्र, तेव्हा करोनाचा प्रादुर्भाव जोरात असल्याकारणाने त्याकडे कुणी फारसे लक्ष दिले नाही. आता करोनाचे संकट पुसट झाल्यानंतरही आयुक्तांनी नवी मुंबईकरांसाठी कोणत्याही नवीन प्रकल्पांची घोषणा केली नाही. उलट सध्या सुरू असलेले आणि याआधी प्रस्तावित असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

मागील दोन वर्षांत करोनाच्या संकटामुळे मालमत्ता, पाणीपट्टी अशा प्रकारची कोणतीही करवाढ करण्यात आली नव्हती. यंदाही तीच प्रथा कायम ठेवण्यात आली आहे. पाचशे चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. सरकारने करमाफी जाहीर केल्यास पालिकेला मिळणारे उत्पन्न १४ कोटींनी कमी होईल, असे आयुक्तांनी अर्थसंकल्पात म्हटले. त्यामुळेच ‘लिडार’ सर्वेक्षणातून मालमत्तांचे मूल्यांकन करून त्याद्वारे योग्य मालमत्ता करआकारणीतून उत्पन्न वाढण्याचा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे. मात्र, यातून दोनशे कोटी जमा होण्याचा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला असून तो अवास्तव ठरण्याची भीती आहे. शहरातील पुनर्वसन प्रकल्प एका वर्षांत पाच पट कमाई करुन देणार असल्याचा अंदाजही मांडण्यात आला आहे.

ठळक वैशिष्टय़े

आगामी वर्षांत वाशी, नेरुळ, ऐरोली येथील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न.

  आरोग्यासाठी जवळजवळ एकूण  खर्चाच्या ५ टक्के

तरतूद.

परिवहन उपक्रमासाठी या वर्षांत पालिकेकडून १५०  कोटीचे अनुदान  वाढवून ते १८१ कोटी देण्याची तरतूद

शहरात  पर्यावरणपूरक वाहनांचा वापर करण्याकडे

अधिक भर

मोरबे धरणावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य.

पर्यावरणावर भर

शहराचे कार्बन ऑडिट करण्याचे नियोजन. माझी वसुंधराअंतर्गत मियावाकी स्वरुपाची दाट जंगलनिर्मिती

निसर्ग उद्यान कोपरखैरणे येथे २२ हजार, ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे ८० हजार व इतरत्र १४ ठिकाणी ७० अशा प्रकारे १ लाख ७२ हजार वृक्षरोपांची मियावकी स्वरुपात लागवड करण्यात येत आहे. यावर्षी  तीन लाख वृक्षलागवडीचे लक्ष्य आहे.

पाणथळ जागांचे संवर्धन, खारफुटीचे पुनरेपण, शहरात व्हर्टिकल गार्डन, ग्रीन गार्डन उभारणी, सोलार ट्रीज आणि जनजागृती उपक्रम, सायकल व ई-बाईकला प्रोत्साहन, युलू सायकल प्रकल्पावर भर.

आरोग्यावर विशेष लक्ष

जून २०२३ मध्ये  पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले शैक्षणिक वर्ष सुरू करणार.

पालिका रुग्णालयात संस्थेद्वारे नाही तर पालिकेच्या वतीनेच डायलिसिस, एचआरसीटी व एमआरआय सुविधा सुरू करणार.

वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून पहिल्या टप्प्यात  सर्जरी, गायनॅक पेडियाट्रिक, आर्थोपेडिक, मेडिसिन विभाग सुरू करणार. त्यातून पालिकेला अधिक मनुष्यबळ प्राप्त करून चांगली आरोग्यसेवा देणार. शहरातील आरोग्यसेवा  सक्षम करण्यात येणार.

कुरिअरद्वारे कर देयके

शहरात मालमत्ता कर हा सर्वात महत्त्वाचा

उत्पन्नाचा स्त्रोत असून प्रत्येकी ६ महिन्यांतून

एकदा त्याची देयके योग्य वेळेत नागरिकांना पोहचण्यासाठी भारतीय डाक सेवा किंवा मान्यताप्राप्त कुरिअर सेवेचा वापर करण्याचा संकल्प पालिका आयुक्तांनी व्यक्त केला. 

झोपडपट्टय़ांत नळजोडणी

नवी मुंबई शहरातील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी

 स्वतंत्र नळजोडण्या देण्याचे सूतोवाच आयुक्तांनी केले आहे. त्यानुसार  झोपडीधारकांनी वैयक्तिक

 नलजोडणी अर्ज, सर्वेक्षण पावती.आधारकार्ड

 प्रत  व १ जानेवारी २०११ पूर्वीच्या वीजजोडणी कागदपत्रे सादर केल्यास झोपडीधारकाला छाननी व खोदाई शुल्क न भरता फक्त १०० रुपये सुरक्षा अनामत रक्कम घेऊन वैयक्तिक नळजोडणी देण्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे.

पुनर्विकास योजनांना दिलासा

शहरात अनेक जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही इमारतींच्या पुनर्विकासाला परवानगीही मिळाली आहे. मात्र, पुनर्विकासाच्या परवानगी प्रक्रियेत अनेक अडथळे येऊन ती लांबत जाते. ते टाळण्यासाठी महापालिका निश्चित प्रक्रिया पद्धत विकसित करणार आहे.

नवीन वर्षांतील प्रकल्प

घणसोली ते ऐरोली उर्वरित पामबीच रस्ता व पूल बांधणे

ऐरोली-काटई मार्गावरून ठाणे-बेलापूर रस्त्यावर ऐरोली येथे चढ-उतारासाठी मार्गिका तयार करणे

वाशी सेक्टर ७ येथील महात्मा फुले जंक्शन ते कोपरी उड्डाण पुलापर्यंत नवीन उड्डाण पूल बांधणे.

  तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बायोगॅस बायो सीएनजी प्रकल्प उभारणे.

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

लिडार सर्वेक्षणद्वारे मोजणी करून उत्पन्न वाढवणे.

पुनप्र्रक्रियायुक्त पाणी एमआयडीसीला विक्री करून उत्पन्न वाढवणे.

परिवहनच्या १०० टक्के बस सीएनजी करणे व पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसचा जास्तीत जास्त वापर करणे

मियावाकी फॉरेस्ट संकल्पना विस्तारित करणे.

पालिकेचे पदव्युत्तर वैद्यकीय विद्यालय होणार

प्रगतिपथावरील प्रकल्प

ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानकासमोर उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू करण्यात येत आहे.

ऐरोली सेक्टर ५ भूखंड ३७ येथे नाटय़गृह बांधण्याचे काम प्रगतिपथावर

नेरुळ सेक्टर १९ अ येथे ८.५० एकर क्षेत्रात सायन्स पार्कचे काम वेगात सुरू

एमआयडीसी क्षेत्रातील उर्वरित १५ कि.मी. रस्त्याचे क्राँक्रीटीकरणाचे काम सुरू

वाशी, तुर्भे, नेरुळ, दिघा आणि ऐरोली येथे उच्चस्तरीय व भूस्तरीय पाण्याची टाकी बांधण्याचे काम प्रगतिपथावर

मालमत्ता आणि पाणीपट्टी यात करवाढ न करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. मात्र उधळपट्टी, अनावश्यक खर्च करण्यावर बंधने घातली पाहिजेत. यंदाचा अर्थसंकल्प आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या त्रिसूत्रीवर आधारित तयार केला आहे. अर्थसंकल्पात राखीव निधीचा खर्च हा नवी मुंबईच्या समतोल विकासासाठी व्हायला हवा.  – गणेश नाईक, आमदार

पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा इत्यादी सर्वच विभागांबाबत विचार करण्यात आलेला आहे. खर्चाचा जसा विचार केला आहे त्याचप्रमाणे अर्थप्राप्तीबाबतही विचार केला आहे. त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणजे बचतीचाही विचार करण्यात आला आहे.    -मंदा म्हात्रे, आमदार

अरेंजा कॉर्नर ते कोपरी येथील उड्डाण पूल, उन्नत पाम बीच मार्ग यासह ऐरोली-काटई हे मार्ग कल्याण, ठाणे, नवी मुंबईदरम्यान प्रवासाचा वेळ वाचवणारे प्रकल्प प्रस्तावित आहेत.  हा चांगला आणि सकारात्मक अर्थसंकल्प आहे.  -विजय चौगुले, माजी विरोधी पक्षनेता

उत्पन्नवाढीसाठी ई-गव्हर्नन्स

महापालिकेच्या उत्पन्न स्रोतांपासून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पालिकेने नियोजन केले असून पालिकेच्या कामकाजात ई गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करुन पालिकेचा कारभार गतिमान, लोकाभिमुख पारदर्शक करण्यात येत असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

जमा-खर्चाच्या हिशेबाबरोबरच यंदाचा अर्थसंकल्प नागरिककेंद्री आहे. नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा देण्याचा व वंचित घटकांना चांगल्या सवलती देऊन शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यांना विशेष महत्त्व देणारा हा अर्थसंकल्प आहे. करवाढ न करता उत्पन्न वाढवण्याचे आमचे प्रयत्न राहतील. – अभिजीत बांगर, महापालिका आयुक्त

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navi mumbai municipal corporation balance budget presented extra income claims akp

ताज्या बातम्या