नवी मुंबई : कोपरखैरणेतील पदपथांची अतिशय वाईट अवस्था झाली असून पदपथांवरून चालणे धोक्याचे झाले आहे. याबाबत शनिवारी ‘कोपरखैरणेत पदपथांची दुरवस्था’या मथळ्याखाली लोकसत्ताने बातमी प्रसिद्ध करताच मनपाच्या संबंधित विभागाला जाग आली असून पदपथांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
कोपरखैरणे परिसराच्या अंतर्गत भागात पदपथांची अवस्था अतिशय वाईट असून त्यावरून चालणे धोक्याचे ठरत आहे. अनेक ठिकाणी मॅनहोलची झाकणे तुटली आहेत. त्यातच पेव्हर ब्लॉक उखडले गेले असून येथे कायम तात्पुरत्या डागडुजीवर भागवले जात आहे.
हे ही वाचा…सिडकोचे खारघरचे घर २ कोटींना; पहिल्याच दिवशी १२०० इच्छुकांची नोंदणी
सेक्टर १९ येथील संतोषी माता मैदानाबाहेरील पदपथावर तर तीन ते चार फूट खोल खड्डा पडला होता. एखाद्या पादचाऱ्याला इजा होऊ नये म्हणून दोन्ही बाजूला दोरी बांधण्यात आली होती. तसेच तीन टाकीसमोरील पदपथावर मॅनहोलवरील झाकण तुटलेले होते. सुमारे महिन्याभरापूर्वी तुटलेल्या झाकणावर तात्पुरती फळी टाकण्यात आली. ही फळी तुटल्यावर शेजारी कचऱ्यात पडलेल्या लाकडी खुर्ची सारखा कोच ठेवण्यात आला होता. याबाबत बातमीत छायाचित्रासह निदर्शनास आणून देण्यात आले होते. बातमी प्रसिद्ध झाल्यावर संबंधित प्रशासनाला खडबडून जाग आली असून अतिखराब अवस्थेतील पदपथ दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. पावसाळा झाल्यावर अन्य दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती संबंधित विभागाने दिली.
उदासीनतेमुळे पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष
वास्तविक विभाग कार्यालयाच्या नजरेच्या टप्प्यात सेक्टर १९ संतोषी माता मैदान आणि तीन टाकीसमोरील खराब पदपथ आहेत. त्यात तीन टाकी पाणीपुरवठा कार्यालय असल्याने पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांचे येथून नियमित जाणे-येणे असते. त्यांना ही बाब समजणे आवश्यक होते. मात्र अभियांत्रिकी विभागातील बांधकाम विभागाचे काम आहे ना? जाऊ द्या आपल्याला काय त्याचे, या उदासीन वृत्तीमुळे हे काम रखडले होते. लोकसत्तामध्ये बातमी आल्यावर मात्र काम सुरू केले गेले, अशी प्रतिक्रिया अशोक अस्वले या ज्येष्ठ नागरिकाने दिली.