नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या १३२ पदांच्या सरळसेवा भरतीची परीक्षा ऐनवेळी स्थगित करण्याचा महासभेने घेतलेला निर्णय अवघ्या काही तासांतच शासनाने स्थगित केल्याने निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. त्यामुळे २१ व २२ जुलै रोजी होणारी ऑनलाइन परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री स्पष्ट केले.

महापालिकेच्या सरळसेवा भरती २०२५-२६ अंतर्गत गट-अ, गट-ब आणि गट-कमधील १३२ पदांसाठी १९,२२० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सहा संवर्गांची ऑनलाइन परीक्षा टीसीएस आयओएनमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या सहा जिल्ह्यांतील १३ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.

सोमवारी झालेल्या महासभेत नवीन सेवा भरती नियमावली मंजूर होईपर्यंत सुरू असलेली भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयामुळे परीक्षेला बसणाऱ्या हजारो उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासन स्तरावरून महासभेचा निर्णय स्थगित करण्यात आला. त्यामुळे नियोजित तारखेला आणि नियोजित वेळेनुसारच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी महापालिकेने विशेष तयारी केली आहे. सहा जिल्ह्यांमध्ये आठ समन्वय अधिकारी आणि १३ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारच्या सुरक्षा विभागाच्या मान्यतेने सर्व परीक्षा कक्षांमध्ये मोबाईल जॅमर बसविण्यात आले आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत माहितीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळासह अधिकृत समाजमाध्यमांवरील माहितीच ग्राह्य धरावी, असे आवाहन केले आहे. तसेच भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने राबविली जात असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.