नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत ६५ नगरसेवकांसह भाजपची एकहाती सत्ता आणणारे वनमंत्री गणेश नाईक यांना महापालिकेतील राजकारणात सहकार्य करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. १४ गाव परिसरातून निवडून आलेल्या एका अपक्ष नगरसेवकाने यापूर्वीच भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले असून, या दोघांनी सत्तेशी जुळवून घ्यावे, अशा सूचना ‘मातोश्री’वरून देण्यात आल्याचे वृत्त आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दोन हात करत वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता आणली. नवी मुंबईत शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करू नये, अशी नाईक यांची आग्रही भूमिका होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाईक यांची ही भूमिका मान्य केली आणि निवडणुकीची संपूर्ण सूत्रे त्यांच्याकडे दिली. नाईक यांनीही अतिशय आक्रमकपणे ही निवडणूक लढवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात थेट भूमिका घेत आपल्या समर्थकांना त्यांनी योग्य तो संदेश दिला. शिंदे यांनी नवी मुंबईत दोन रोड शो केले. मतदानाच्या आदल्या रात्री शिंदे नवी मुंबईत तळ ठोकून होते. असे असतानाही संपूर्ण नाईक कुटुंब आक्रमकपणे या निवडणुकीत उतरल्याचे पाहायला मिळाले.

१११ पैकी ६५ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. यामध्ये सीवूड्सचे दीपक पवार यांचा एकमेव अपवाद वगळता इतर ६४ नगरसेवक हे गणेश नाईक यांचे कडवे समर्थक आहेत. महापौर आणि उपमहापौर पदासाठी नाईक यांनी अनुक्रमे सुजाता सुरज पाटील आणि दशरथ सिताराम भगत या आपल्या समर्थकांची निवड करून महापालिकेवर आपला शब्द अंतिम राहील अशीच रचना केली आहे. हे करत असताना नाईक समर्थकांनी उद्धव ठाकरे गटाचे दोन आणि एका अपक्ष असे तीन नगरसेवक सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

दरम्यान, उद्धव सेनेकडून भाजपला थेट पाठिंबा दिला जाणार नसला तरी प्रभागातील कामे तसेच निधी वाटपात सहकार्याचे धोरण राबविले जाईल, असा शब्द या दोघा नगरसेवकांना दिला गेल्याचे समजते. यासंबंधी वनमंत्री गणेश नाईक यांच्याबरोबर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नगरसेवक विशाल विचारे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मातोश्रीवरून जो आदेश येईल, त्याप्रमाणे आम्ही भूमिका घेऊ,’ असे त्यांनी सांगितले.

संदीप नाईक सक्रिय, भेटींचे सत्र सुरू

  • नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या १४ गावांतून निवडून आलेल्या भरत भोईर या अपक्ष नगरसेवकाने यापूर्वीच भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
  • उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून विशाल विचारे आणि विशाल ससाणे हे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेतून अभिजित देसाई निवडून आले.
  • निवडणुकांच्या रणधुमाळीत नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकेचे प्रहार केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातही त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त होताना दिसत होती. याच काळात ‘मातोश्री’वरून गणेश नाईक यांच्याबरोबर संवादही साधला गेल्याची चर्चा आहे.
  • महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा विजय पक्का मानला जात असतानाच वनमंत्री गणेश नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप नाईक हे सक्रिय झाल्याची चर्चा आहे.
  • ठाकरे गटाच्या दोघा नगरसेवकांनी संदीप नाईक यांची भेट घेऊन पुढील वाटचालीसंबंधी चर्चा केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. शिंदे गटाच्या नगरसेवकांबरोबर विरोधी बाकांवर बसणार नाही, अशी स्पष्ट भूमिका या दोघा नगरसेवकांनी मांडल्याचे समजते.