नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ‘लोककला मंच’ची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी ५ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. घणसोली विभागात लोककला मंचाची निर्मिती केली जाणार असून त्यासाठी नुकत्याच मांडलेल्या महापालिका अर्थसंकल्पात ५ कोटीच्या निधीची तरतूद केली आहे.

लोककला मंचावर लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड, गोंधळ, कीर्तन यांसारख्या अनेक कला सादर केल्या जातात. या कलेद्वारे समाजाला मनोरंजनासोबतच चांगला सामाजिक संदेशही दिले जातात. त्याचप्रमाणे शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर लोककलेच्या माध्यमातून जनजागृती केली जाते.

नवी मुंबईत मूळ आगरी कोळी बांधवाची संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीबरोबरच आगरी कोळ्यांच्या व संपूर्ण महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे दर्शन होण्यासाठी व तिचे जतन करण्यासाठी लोककला मंच हा महत्वाची भूमिका बजावणार आहे. कलेद्वारे लोकांचे मनोरंजन होतेच, पण त्याचबरोबर समाजाला चांगले संदेशही मिळतात.

लोककला मंच हा आपल्या ग्रामीण कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी देतो. त्याच कल्पनेतून नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच लोककला मंचची निर्मिती नवी मुंबई शहरात होणार आहे. त्यासाठीची तरतूदही पालिकेच्या अर्थसंकल्पात प्रथमच करण्यात आली आहे.

कोट –

लोकमंचाच्या माध्यमातून विविध लोककलांची जपणूक करण्याबरोबरच ती वृद्धिंगत करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. लोककला मंचाचे हक्काचे व्यासपीठ निर्माण केले जाईल. घणसोली विभागात लोककला मंचाची निर्मिती केली जाणार असून त्यासाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. सागर नाईक ,सभागृह नेते

शहराला पुढे घेऊन जाताना सांस्कृतिक व लोककला मंचच्या माध्यमातून संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुरू आहे. तो अतिशय सकारात्मक आहे. त्यामुळे सकारात्मकेते पुढे होणारे बदल स्वीकारुन शहराचा विकास साधणे हेच सर्वांचे लक्ष आहे. सुधाकर सोनावणे, नगरसेवक