नवी मुंबई पालिका

संतोष जाधव

नवी मुंबई : मुंबईला लागूनच असलेल्या नवी मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण १३ मार्च रोजी सापडला. त्यापाठोपाठ शहरातील दिघा, ऐरोली, कोपरखरणे, नेरुळ, तुर्भे या झोपडीबहुल भागांत करोनाचा संसर्ग वेगाने पसरण्यास सुरुवात झाली. यातच वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार म्हणजे करोनाचे केंद्रच बनले. असे असतानाही सुरुवातीच्या काळात नवी मुंबई महापालिकेची पावले सुस्तपणानेच पडत होती. उलट पालिकेतील काही अधिकाऱ्यांवर करोनाकाळात भ्रष्टाचाराचे आरोपही झाले, पण पालिका आयुक्त बदलताच शहरात करोना निदान चाचण्यांनी वेग घेतला आणि पाठोपाठ रुग्णसंपर्क शोधमोहीमही तीव्रपणे सुरू झाली.

भांबावलेली आरोग्यव्यवस्था

शहरात करोनाचा प्रारंभ आणि दुसरीकडे नवख्या आजारामुळे भांबावलेल्या आरोग्यव्यवस्थेने शहरातील तोकडय़ा आरोग्यव्यवस्थेचे पितळ उघडे पडले, परंतु पालिकेने सर्वसामान्यांसाठी एकमेव असलेले वाशी सार्वजनिक रुग्णालय विशेष करोना रुग्णालयात रूपांतर केले. परंतु १५  लाख लोकसंख्येच्या शहरात सामान्य नागरिकांसाठी हेच एकमेव रुग्णालय होते.  ते अपुरे पडू लागले.

खासगी रुग्णालयांकडून लूट

पालिकेने शहरात सिडको प्रदर्शनी केंद्र येथे १२०० खाटांचे रुग्णालय उभारण्यास सुरुवात केली, परंतु शहरात खाटांचा प्रचंड तुटवडा जाणवू लागल्याने खाटा व खासगी रुग्णालयातील देयकांचे आकडे यावरून वादंग निर्माण झाले. पालिकेने शहरातील खाटांचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे शहरात विविध विभागांत करोना काळजी केंद्रे सुरू केली.  शहरात करोनाचा प्रसार वाढतच गेला आणि करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका पालिका आयुक्तांना बसला व तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली झाली.

नवीन आयुक्तांची तत्परता

नवे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सूत्रे हाती घेताच सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरात प्रतिजन चाचण्यांची सुरुवात केली, तर अवघ्या ११ दिवसांत नवी मुंबई महापालिकेची स्वतंत्र अद्ययावत प्रयोगशाळा सुरू केली. त्यामुळे नवी मुंबई क्षेत्रातील चाचण्यांची संख्या वाढू लागली. या प्रयोगशाळेमध्ये आजपर्यंत जवळजवळ  १ लाख ८२ हजारांहून अधिक नागरिकांच्या मोफत आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.

बनावट अहवालामुळे घोळ

चाचणी न करताच अनेक अहवाल प्राप्त  झाल्याने शहरात बोगस चाचणी प्रकारावरून गदारोळ झाला. त्यात एका डॉक्टरांना निलंबित करण्यात आले, परंतु चौकशी  कमिटीमध्ये कोणत्याही प्रकारे बोगस चाचण्या प्रकार नसून डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या चुकांमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले.