नवी मुंबई : नवी मुंबईत बुधवारी दिवसभर घडलेल्या दोन दुर्घटनांमुळे महापालिका प्रशासनाला गुरुवारी दिवसभर राजकीय रोषाला सामोरे जावे लागले. मुसळधार पावसात नेरुळ जवळील एल.पी. उड्डाणपूलाखाली पावसाच्या पाण्यातून जात असताना दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागला. ही घटना ताजी असताना ऐरोलीतील माता बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनांचे दिवसभर पडसाद उमटले. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी याप्रकरणी महापालिका आयुक्तांच्या दालनात ठाण मांडत निषेधाचा सूर आळवला.

मुसळधार पावसामुळे बुधवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास नेरुळ एल.पी. उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यातून जात असताना शुभांगी बलखंडे (१७ वर्षे) आणि उज्ज्वला वाघ (१९ वर्षे) या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा जबर धक्का बसला. या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी घटनेची दखल घेत त्यांना पुढील उपचारासाठी वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात हलविले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींची भेट घेतली. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महापालिकेकडून करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच विजेचा धक्का नेमका कोणत्या विद्युत तारेच्या संपर्कात पाणी आल्यामुळे बसला, याची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान नेरुळ पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू असून, चौकशी अहवालानंतरच या गंभीर घटनेची नेमकी जबाबदारी स्पष्ट होणार आहे.

या घटनेने पावसाळ्यात सखल भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध यंत्रणांमधील समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित ठिकाणी वीजप्रवाह नेमका कशामुळे निर्माण झाला, त्या यंत्रणेची देखभाल कोणाच्या अखत्यारीत होती आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे. भर पावसात सार्वजनिक ठिकाणी विद्युत तारा, पथदिवे आणि विद्युत यंत्रणांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने पुरेशी दक्षता घेतली होती का, हाही प्रश्न या घटनेनिमित्ताने उपस्थित झाला आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या विद्युत सुरक्षेच्या उपाययोजनांची परिणामकारकताही आता तपासली जाणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

राजकीय पडसाद

विद्यार्थिनींनी लागलेल्या विजेच्या धक्याच्या घटनेचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. मनसेने या प्रकरणात जबाबदार असलेल्या महापालिकेच्या विद्युत विभागातील संबंधित अभियंत्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नेरुळचे पोलीस सहाय्यक आयुक्त मयूर भुजबळ यांच्याकडे केली.

महावितरणने महापालिकेकडे बोट

नेरुळ एल.पी. उड्डाणपुलाखाली घडलेल्या घटनेनंतर महावितरणने तातडीने स्पष्टीकरण देत संबंधित ठिकाणी त्यांच्या वीजवितरण यंत्रणेत कोणताही बिघाड नसल्याचा दावा केला. संबंधित परिसरातील महावितरणच्या वीजवाहिन्या आणि उपकरणे सुरक्षित असल्याचे नमूद करत, विजेचा प्रवाह महापालिकेच्या पथदिवा यंत्रणेतून झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या घटनेचा संबंध महावितरणच्या वीजपुरवठा यंत्रणेशी नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

उत्तरदायित्वाचा मुद्दा चर्चेत

महापालिकेने कोणत्या विद्युत तारेच्या संपर्कात पाणी आल्यामुळे विद्यार्थिनींना विजेचा धक्का बसला, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत या घटनेची नेमकी जबाबदारी निश्चित होणार नसली, तरी महावितरणने सुरुवातीलाच जबाबदारी महापालिकेच्या पथदिवा यंत्रणेकडे निर्देशित केल्याने या प्रकरणात उत्तरदायित्वाचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे.