नवी मुंबई – नवी मुंबईतील नागरिकांना सर्व सोयी सुविधा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिका आग्रही असल्याचे दिसून येत आहे. जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणीसाठीची प्रक्रिया अधिक अद्ययावत करण्याचे निर्देश आयुक्त कैलास शिंदे यांनी दिले असून या सेवा आता डिजीटल स्वरूपात घरबसल्या उपलब्ध होणार आहेत.मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा राबवत असताना सेवासुविधांची लोकाभिमुख सुलभता आणि गतीमानता यावर नवी मुंबई महापालिकेच्यावतीने भर दिला जात आहे. या कृती आराखड्यांतर्गत मुख्यालय, विभागीय कार्यालये, शाळा, रुग्णालये अशा विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. तसेच विविध कार्यालयातील कार्यप्रणाली अधिक गतीमान सुधारणा व्हावी या उद्देशाने सकारात्मक पाऊले उचलली जात आहेत.

याच अंतर्गत आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी कोपरखैरणे विभाग कार्यालयाला भेट देऊन कार्यालयीन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करून, नागरिकांना घरूनच नोंदणी करता यावी आणि प्रमाणपत्रे ऑनलाईन स्वरूपात मिळावीत, यासाठी विद्यमान प्रणालीत आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभतेवर विशेष भर देण्यात यावा असेही सांगितले. ऑनलाईन अर्ज करणे, डिजीटल कागदपत्रे समाविष्ट करणे आणि उपस्थित राहण्यासाठी दूरध्वनी संदेशाद्वारे सूचित करण्याची प्रणाली लागू करण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच ही सेवा नागरिक स्वतः किंवा सेतू केंद्राच्या माध्यमातून करू शकणार आहेत. त्याचप्रमाणे कोपरखैरणे कार्यालयात स्वच्छता आणि अभिलेख व्यवस्थापनाबाबतही आयुक्तांनी सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले. नागरिकांसाठी बैठक व्यवस्थेमध्येही काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.

अन्य सेवांमध्येही सुधारणा

डेब्रिज परवानगी, मैदान वापर, मालमत्ता हस्तांतरण आणि मूल्यांकन प्रणाली यामध्येही डिजीटल सुधारणा करण्याचे आदेश आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी प्रत्येक मजल्यावर दर्शनी भागात लावाण्यात यावी. तसेच सर्व नोंदी व्यवस्थित नमूद करून विभाग अधिकाऱ्यांनी त्यावर नियंत्रण ठेवावे, असेही आदेश देण्यात आले आहेत

माता-बाल रुग्णालयाच्या कामाची पाहणी

या पाहणी दौऱ्यात कोपरखैरणे माता-बाल रुग्णालयाच्या कामाचे पाहणी करण्यात आली. रस्त्यावरील दोन्ही प्रवेशद्वारांचे विस्तारीकरण आणि अडथळे दूर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि कार्यकारी अभियंता अजय संख्ये यांना आवश्यकत्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.