नवी मुंबई : शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून त्यावरील कारवाईत टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच फेरीवाल्यांना कारवाईचा आधीच सुगावा लागत असल्याने अडचणी येतात. परंतु, आता पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार सात जणांचे मुख्यालय स्तरावर केंद्रीय अतिक्रमण दक्षता पथक निर्माण केले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या आठ विभाग अधिकाऱ्यांना शहरातील कोणत्याही विभागात केंद्रीय अतिक्रमण दक्षता पथक त्या ठिकाणी कारवाईचे आदेश देईल तेथे कारवाई करावी लागणार असून त्यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाईत पारदर्शकता येणार आहे.
हेही वाचा…पनवेल: जलवाहिन्यांवर बूस्टरपंप बसविल्यास गृहनिर्माण संस्थेवर सिडको कारवाई करणार
उच्च न्यायालयाने ३१ डिसेंबर २०१५ आधीची आणि नंतरची किती बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत याचे सर्वेक्षण करा तसेच २०१५ सालानंतरच्या बेकायदा बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वीच नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत. नवी मुंबईत सुमारे चार हजारांच्या वर अनधिकृत बांधकामे आहेत. आता मुख्यालय स्तरावरच केंद्रीय अतिक्रमण दक्षता पथक निर्माण केल्याने आता शहरात कारवाईचा सपाटा पाहायला मिळणार असून लागेबांधे निर्माण झाल्याने कारवाईत होणारी टाळाटाळ संपुष्टात येणार आहे.
विभाग कार्यालयातील फेरीवाल्यांच्या कारवाईसाठी जाणाऱ्या पथकातील काही जणांचे हितसंबंध निर्माण होऊन अतिक्रमण पथक पोहोचण्याआधीच फेरीवाले तिथून जात असल्याचे पाहायला मिळत होते. आता कोणत्याही विभागातील कारवाईसाठीचे तात्काळ निर्देश मिळणार असल्याने छुपी सौदेबाजी तसेच कारवाईतील टाळाटाळ रोखली जाणार आहे.
हेही वाचा…उरण: सिडकोच्या विद्यावेतनाची प्रतीक्षा, चार हजारांपैकी अवघ्या ४५० विद्यार्थ्यांना विद्यावेतन मंजूर
शहरात अनधिकृत बेकायदा बहुमजली इमारतींची संख्याही मोठी आहे. पालिका फक्त नोटीस बजावून संबंधित सदनिका अनधिकृत असून या ठिकाणी नागरिकांनी सदनिका खरेदी करू नये असे आवाहन करते. याच अनधिकृत बांधकामांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे हजारो नागरिकांची फसवणूक होत आहे, आता त्यावर अंकुश येणार आहे. पालिका अधिकाऱ्यांकडून अतिक्रमणाबाबत काणाडोळा केला जात होता. अनेक विभागांत वर्षानुवर्षे तेच तेच अधिकारी अतिक्रमण विभागावर ठाण मांडून बसल्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात नव्हती, आता त्याला आळा बसणार आहे.
केंद्रीय अतिक्रमण दक्षता पथकात अतिक्रमण उपायुक्त, साहाय्यक आयुक्त अतिक्रमण मुख्यालय, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, मुख्यालय, लिपिक, लघुटंकलेखक यांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा…पर्ससीन मच्छिमारांचे उद्यापासून आंदोलन, इतर राज्यांप्रमाणे पर्ससीन मासेमारीला परवानगी देण्याची मागणी
केंद्रीय अतिक्रमण दक्षता पथकाद्वारे कोणत्याही विभागातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, रहदारीतील अडथळे, बेवारस वाहने यांच्यासह अनधिकृत इमारतींवरही कारवाई करण्यात येईल. कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर त्या विभागात जाऊन इतर विभागांतील अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागणार असल्याने जाणीवपूर्वक केली जाणारी टाळाटाळ, दिरंगाई टाळून कारवाईचा वेग वाढणार आहे. – डॉ. अमोल पालवे, साहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभाग, मुख्यालय