नवी मुंबई : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासांपासून बचाव करण्यासाठी सोपे नियम पाळण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार, नागरिकांनी दिवसभरात पुरेसे पाणी पिण्यावर भर द्यावा.

ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच, पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरणे आणि डोक्यावर टोपी घालणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. उन्हाचा तीव्र परिणाम टाळण्यासाठी बाहेरील कामे सकाळी १० वाजण्यापूर्वी किंवा सायंकाळी ४ नंतरच करावीत. दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याचबरोबर, उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत, तसेच दुपारी २ ते ४ या वेळेत स्वयंपाक करणे शक्यतो टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. आरोग्यास अपायकारक ठरू शकणारे चहा, कॉफी, मद्यपान आणि कार्बोनेटेड पेये यांचा वापर कमी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लहान मुले, गरोदर महिला आणि वृद्ध व्यक्ती यांची विशेष काळजी घेण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली आहे.

उन्हाळ्यातील आरोग्यविषयक अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या महापालिका रुग्णालय किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.