पालिकेची वैद्यकीय सेवा आजारी

वाशी सेक्टर १०मध्ये पालिकेने २० वर्षांपूर्वी ३० कोटी रुपये खर्च करून मध्यवर्ती रुग्णालये उभारले.

रुग्णालयांच्या केवळ इमारती; सेवा मात्र नाही

जागेच्या मोबदल्यात वर्षांला ८०० गरजूंना मोफत सेवा देण्याऱ्या हिरानंदानी फोर्टिज हेल्थ केअरला कारभार आवरण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिलेले असताना पालिकेची वैद्यकीय सेवा मजबूत करण्यासाठी मात्र कोणतेही पाऊल उचण्यात आलेले नाही. नेरुळ व ऐरोली येथील ‘माता बाल संगोपन केंद्रां’च्या जागी प्रत्येकी १०० खांटाच्या रुग्णालयांच्या इमारती तर बांधून तयार आहेत, पण ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली नाहीत. वाशी रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन डॉक्टरांनी सेवेला कायमचा रामराम ठोकला आहे. त्यामुळे पालिकेची वैद्यकीय सेवा आजारी असल्याचे स्पष्ट होत आहे.

वाशी सेक्टर १०मध्ये पालिकेने २० वर्षांपूर्वी ३० कोटी रुपये खर्च करून मध्यवर्ती रुग्णालये उभारले. त्यातील दोन लाख चौरस फूट क्षेत्रफळ वापराविना पडून आहे. ते हिरानंदानी हेल्थ केअरला देण्यात आले होते. त्यांनी तेथील रुग्णालय नंतर फोर्टिज या रुग्णालयाला परस्पर चालविण्यास दिले. हा व्यवहार पालिकेला विश्वासात न घेता करण्यात आला. त्यामुळे पालिकेने पूर्ण चौकशीअंती करारातील अटी व शर्तीचा भंग केल्याचे स्पष्ट केले व ती जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. हिरानंदानी फोर्टिज रुग्णालयाला दोन लाख क्षेत्रफळ भाडेपट्टय़ावर देण्याच्या मोबदल्यात वर्षांला ८०० अल्प उत्पन्न गटातील रुग्णांवर उपचार करण्याचा करार झाला होता. त्यानुसार हिरानंदानी फोर्टिजने पालिकेने शिफारस केलेल्या दीड हजार रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. पालिकेने दिलेल्या नोटीसप्रमाणे हिरानंदानी फोर्टिज रुग्णालयाची जागा ताब्यात घेतली जाणार आहे मात्र याच वेळी पालिका स्वत:ची वैद्यकीय सेवा सक्षम करण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. ऐरोली व नेरुळ येथे तीन वर्षांपासून पाच मजल्यांच्या दोन इमारती बांधून तयार ठेवण्यात आल्या आहेत. या रुग्णालयांसाठी अद्याप डॉक्टर मिळत नसल्याने ती पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली नाहीत. त्या ठिकाणी केवळ बाह्य़ रुग्ण आणि स्त्रीरोग व बालरोगतज्ज्ञ आहेत. अपुऱ्या सुविधांमुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना वाशी येथे हलविले जाते. वाशी येथील मध्यवर्ती रुग्णालयातील खांटांची संख्या २५० असताना तेथे ४०० पेक्षा जास्त रुग्ण दाटीवटीने उपचार घेतात. बाह्य़रुग्ण सेवेचा लाभ दररोज १६०० पेक्षा जास्त रुग्ण घेतात. कामाचा ताण व कमी वेतन यामुळे डॉ. क्षितिज डोके व डॉ. वेदपाठक यांनी नुकताच रुग्णालयाला रामराम ठोकला आहे. ‘एक्स रे’ची दोन यंत्रे असताना तीन महिने एक यंत्र बंद आहे. एमआरआय सीटी स्कॅन बाहेरून करून घेतले जाते. त्यासाठी पालिका मोठी किंमत मोजते. सोनोग्राफीचे खासगी कंत्राट देण्यात आले आहे. शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना संगणकाद्वारे जोडून पारदर्शी कारभार केल्याचा दावा करणाऱ्या पालिकेला स्वत:ची वैद्यकीय सेवा मात्र सुदृढ ठेवता न आल्याचे स्पष्ट होत आहे.

अन्य पालिकांपेक्षा कमी वेतन

मुंबई, ठाणे पालिकेतील डॉक्टरांना नवी मुंबई पालिकेतील डॉक्टरांच्या तुलनेत जास्त वेतन आहे. त्यामुळे अनेक डॉक्टर या पालिकेत काम करण्यास तयार होत नाहीत. आहेत ते नोकरी सोडून जात  आहेत.

पालिकेची दोन्ही रुग्णालये सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमकरता असून कंत्राटी पद्धतीने डॉक्टर सेवेत येण्यास राजी होत नाहीत. वाशी रुग्णालयातील डायलिसीस, सीटी स्कॅन आणि पॅथॉलॉजी यांचे आऊटसोर्सिग करण्याचा प्रस्ताव आहे.

– डॉ. रमेश निकम, मुख्य वैद्यकीय अधिकारी , नवी मुंबई पालिका

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Navi mumbai municipal corporation hospital not providing better service