नवी मुंबई : महागाई व करोना काळात दोन वर्षे गणवेश खरेदीसाठी न दिलेले अनुदान यामुळे यावर्षी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने या अनुदानात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणेवश खरेदी करून त्याचे देयके शाळांत देण्याचे आवाहन केले आहे.

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध योजना देण्यात येतात. डिजिटल शिक्षण व केंद्रीय मंडळाच्या शाळांचा समावेश आहे. करोनापूर्वी दोन शैक्षणिक वर्षात गणवेश खरेदीला विलंब झाला होता. शैक्षणिक वर्षाअखेर त्यांना गणेवश देण्यात आले होते. त्यांनतर करोना सुरू झाला. त्यामुळे शाळा ऑनलाइन सुरू झाल्याने गणवेश खरेदी केली नव्हती. आता पुन्हा जूनपासून शाळा झाल्या आहेत. प्रत्यक्ष लाभार्थी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी आधी स्वः खर्चाने शालेय साहित्य खरेदी करून त्याचे वस्तू व सेवा करसहित असलेले पावती शाळेत जमा करावयाचे आहेत. त्यांनतरच विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय साहित्य खरेदीची रक्कम खात्यात वर्ग करण्यात येईल अशी योजना लागू आहे. विद्यार्थ्यांना आठ प्रकारच्या शैक्षणिक शालेय वस्तूंची पूर्तता करण्यात येते. यात शालेय गणवेश २, पिटी गणवेश १, स्काऊट गाईड गणवेश १, शूज २ , वह्या, पाठ्यपुस्तके, दप्तर, रेनकोट यांचा समावेश आहे. प्रति विद्यार्थ्यांला यासाठी तीन ते चार हजार खर्च येत होता. आता या अनुदान रक्कमेत १० टक्के वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण अधिकारी जयदीप पवार यांनी दिली आहे.

गणवेश खरेदी अनुदान

गणवेश सन २०२१-२२ सन २०२२-२३

शालेय २ : ३३८ ते ९५१ ४०५ ते १०४६

पिटी १ : ९२९ ते ११९० १०२२ते १३०९

स्काऊट गाईड : १७१० ते १७७५ १८८१ ते १९५३