नवी मुंबई : वृक्षांची पडझड रोखण्याबरोबरच शहरातील वृक्षसंपदेचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील वृक्षांच्या बुंध्याभोवती करण्यात आलेले काँक्रीटीकरण, डांबरीकरण आणि पेव्हर ब्लॉक तातडीने हटवून किमान एक मीटर जागा मोकळी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित विभागांना सोमवारी झालेल्या बैठकीत दिले. तसेच मोठ्या वृक्षांसाठी किमान दीड मीटरचे आळे तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पावसाळ्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वृक्ष तसेच फांद्या पडण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर वृक्षांच्या पडझडीची कारणे शोधण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची बैठक झाली. वृक्षांच्या मुळांना पुरेशी जागा न मिळणे, विविध विकासकामांमध्ये वृक्षांची मुळे कापली जाणे, अशास्त्रीय छाटणी, सूर्यप्रकाशाच्या दिशेने वृक्ष झुकणे आणि अयोग्य वृक्षप्रजातींची लागवड ही प्रमुख कारणे असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
रस्ते आणि गृहनिर्माण संस्थांच्या विकासकामांमध्ये वृक्षांच्या बुंध्यालगत सिमेंट, काँक्रीट, डांबर किंवा पेव्हर ब्लॉक बसविले जातात. त्यामुळे पाणी मुरण्यास तसेच मुळांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. केबल, जलवाहिनी, मलनिस्सारण आणि गॅसवाहिन्यांसाठी होणाऱ्या खोदकामात मुळांना इजा झाल्याने वृक्षांची जमिनीवरील पकड कमकुवत होते. एका बाजूला सूर्यप्रकाश कमी मिळाल्यास वृक्ष प्रकाशाच्या दिशेने झुकतो. त्याचप्रमाणे एका बाजूच्या फांद्या अशास्त्रीय पद्धतीने छाटल्यास दुसऱ्या बाजूला अतिरिक्त भार निर्माण होऊन वाऱ्यात वृक्ष पडण्याचा धोका वाढतो.

वृक्षांची छाटणी शास्त्रीय पद्धतीने करावी आणि नव्या लागवडीसाठी स्थानिक प्रजातींना प्राधान्य द्यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. वृक्षांच्या मुळांना इजा होऊ नये म्हणून विकासकामांतील खोदकाम उद्यान सहाय्यकांच्या नियंत्रणाखाली करावे आणि आवश्यकतेनुसार वृक्ष अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी. विकासकामासाठी वृक्ष तोडणे किंवा स्थलांतरित करणे आवश्यक असल्यास वृक्ष प्राधिकरणाची पूर्वपरवानगी बंधनकारक राहणार आहे. विनापरवानगी वृक्षतोड किंवा वृक्षाच्या जीवितास हानी पोहोचविल्यास संबंधितांवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील कलम २१(१) अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

विकासकामांच्या नावाखाली वृक्षांच्या मुळांवर होणारे अतिक्रमण थांबवून त्यांना वाढीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे, हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. वृक्षांना मोकळी जागा, पाण्याचा निचरा आणि शास्त्रीय पद्धतीने छाटणी मिळाल्यास त्यांची जमिनीवरील पकड मजबूत राहण्यास मदत होईल. त्यामुळे पावसाळ्यातील वृक्षपडझडीचा धोका कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील विद्यमान वृक्षसंपदा दीर्घकाळ टिकविण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.

एक मिटरची मोकळी जागा

महापालिकेच्या विशेष मोहिमेत शहरातील वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यांच्या भोवतीचे काँक्रीट, डांबर आणि पेव्हर ब्लॉक काढण्यात येणार आहेत. वृक्षाभोवती किमान एक मीटरची मोकळी जागा ठेवावी. मोठ्या वृक्षांसाठी दीड मीटरचे आळे करावे. या आळ्यातील मातीची पातळी बाहेरील जमिनीपेक्षा किमान सहा इंच खाली ठेवावी आणि आजूबाजूच्या जमिनीचा उतार आळ्याकडे ठेवावा, जेणेकरून पावसाचे पाणी वृक्षाच्या मुळांजवळ मुरेल. आळ्याभोवती वीट किंवा सिमेंटचे बांधकाम करू नये, असेही निर्देश आहेत.

रस्त्यांच्या रुंदीनुसार लागवड

नव्याने विकसित होणाऱ्या रस्त्यांवर वृक्षलागवडीसाठी नियमांनुसार जागा राखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २४ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर प्रत्येक १० मीटर अंतरावर, १२ ते २४ मीटर रुंदीच्या रस्त्यांवर दुतर्फा प्रत्येक १० मीटर अंतरावर, तर सहा ते १२ मीटर रुंदीच्या रस्त्यांवर प्रत्येक २० मीटर अंतरावर वृक्षलागवड करण्याचे प्रमाणक आहे. दुभाजकांमध्ये झुडुपे व रोपांसाठी चार ते पाच फूट जागा ठेवावी. जागा शक्य नसल्यास दुभाजक जोडून बांधण्याच्या सूचना आहेत.