नवी मुंबई : शाळा-महाविद्यालयांच्या ५० मीटर परिसरात पानटपरी दिसता कामा नये, असे स्पष्ट निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या वाढत्या वापराचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या समन्वयाने सातत्यपूर्ण कारवाई करण्याच्या सूचना विभाग अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. या कारवाईसाठी पोलिसांनी महापालिका यंत्रणेला सहकार्य करावे, असेही आयुक्तांनी सांगितले. महापालिकेच्या विविध विभागांच्या शुक्रवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत शहरातील नागरिकांच्या सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांचा आयुक्तांनी आढावा घेतला.

गणेशोत्सवापूर्वी शहरातील पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पदपथांवरून नागरिकांना विनाअडथळा चालता यावे यासाठी अधिकृत फेरीवाल्यांना पर्यायी जागेत हलविणे आणि अनधिकृत फेरीवाले हटविण्याची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विभाग कार्यालयाने कारवाईचा आराखडा तयार करून पथके नियुक्त करावीत आणि प्राधान्यक्रम निश्चित करून कारवाईत सातत्य ठेवावे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि बाजार परिसरातील पदपथांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

रात्रीच्या खाद्यगाड्यांवरही कारवाईच्या सूचना

महापालिकेकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर दिवसा कारवाई केली जाते. मात्र, सायंकाळनंतर अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहून मध्यरात्रीपर्यंत व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रात्रीच्या कारवाईसाठी स्वतंत्र पथके तयार करून मोहीम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रात्री ११ नंतर रस्त्यावर खाद्यपदार्थांची विक्री करण्यास मनाई करण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई दररोज सातत्याने करण्याचेही निर्देश देण्यात आले.

स्थानकांवरील अमली पदार्थांवर लक्ष

रेल्वे स्थानक आणि परिसरातील अमली पदार्थांची विक्री व वापर रोखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या सहकार्याने नियमित कारवाई करावी, असे आयुक्तांनी सांगितले. शहरातील वाढती बेघरांची संख्या आणि त्याचा स्वच्छता व शहर नियोजनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन याबाबतही मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

बेवारस वाहने हटविण्याच्या सूचना

रस्त्यांवर तसेच रेल्वे स्थानकांच्या वाहनतळांमध्ये मोठ्या प्रमाणावर धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांमुळे अस्वच्छता निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या सहकार्याने सर्व विभाग कार्यालयांच्या क्षेत्रात धडक मोहीम राबवून अशी वाहने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डेमुक्त रस्ते, आगमन-विसर्जन मार्गांवरील झाडांची छाटणी, कृत्रिम तलावांची व्यवस्था, दिवाबत्ती सुविधा आणि अनधिकृत बॅनर्सवर कारवाई यांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. या सर्व कामांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिमंडळ उपआयुक्त डॉ. अमोल पालवे, संजय शिंदे, विविध विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता तसेच पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संदेश नाईक, पोलीस निरीक्षक थिटे आणि सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.