नवी मुंबई : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात कागदाचा वापर कमी करून संपूर्ण यंत्रणा डिजिटल करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेतील फाईल्सची ने-आण, प्रशासकीय टिपण्या, विविध प्रस्ताव, निर्णय, ठराव आणि टपाल व्यवस्थापन यांसह दैनंदिन कामकाज कागदविरहित करण्यासाठी ‘पेपरलेस एनएमएमसी’ ही प्रणाली राबविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आगामी महासभेत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. सभागृह नेते सागर नाईक यांनी यासंदर्भातील ठरावाची सूचना मांडली आहे.
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सध्या नस्तीच्या माध्यमातून बहुतांश प्रशासकीय व्यवहार चालतात. एखादी नस्ती एका विभागातून दुसऱ्या विभागात किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्याच्या प्रक्रियेत बराच वेळ जातो. नस्तीची सद्यस्थिती जाणून घेणे, जुन्या नोंदी शोधणे तसेच कागदपत्रांचे जतन करणे यासाठीही मनुष्यबळ आणि वेळ खर्ची पडतो. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासकीय कामकाज डिजिटल प्रणालीवर आणण्याचा विचार पुढे आला आहे.
प्रस्तावित ‘पेपरलेस एनएमएमसी’ प्रणालीमध्ये अंतर्गत नस्ती व्यवस्थापनाबरोबरच टिपण्या, प्रस्ताव, प्रशासकीय निर्णय, ठराव आणि टपाल व्यवस्थापनाचा समावेश असेल. त्यामुळे नस्तीची प्रत्यक्ष ने-आण करण्याऐवजी संबंधित अधिकारी डिजिटल माध्यमातून कागदपत्रे पाहू शकतील आणि त्यावर आवश्यक कार्यवाही करू शकतील. नस्ती कोणत्या विभागात किंवा अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे, याचा मागोवा घेणेही शक्य होऊ शकेल. परिणामी प्रशासकीय निर्णय प्रक्रियेतील विलंब कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
महासभेची मान्यता मिळाल्यानंतर या प्रणालीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक यंत्रणा, सर्व्हरची क्षमता, माहितीची सुरक्षितता, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि टप्प्याटप्प्याने होणारे संगणकीकरण याबाबतची कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे केवळ प्रस्ताव मंजूर होण्यापेक्षा तो प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबविला जातो, यावर महापालिकेच्या कागदविरहित कारभाराचे यश अवलंबून असेल.
कागद आणि स्टेशनरीवरील खर्च कमी होणार
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची छपाई केली जाते. महासभा आणि इतर बैठकांचे विषयपत्र, प्रस्तावांच्या प्रती, कार्यालयीन पत्रव्यवहार तसेच विविध अहवालांसाठी कागदाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.डिजिटल प्रणालीमुळे या खर्चात कपात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कागदाचा वापर कमी झाल्याने पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागेल. महापालिकेच्या ‘ग्रीन ऑफिस’ संकल्पनेच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
याशिवाय महापालिकेचे महत्त्वाचे दस्तऐवज, अभिलेख आणि प्रशासकीय कागदपत्रे डिजिटल स्वरूपात जतन करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या नोंदी शोधणे आणि आवश्यकतेनुसार त्या उपलब्ध करून घेणे अधिक सुलभ होऊ शकते. मात्र, या डिजिटल नोंदींची सुरक्षितता, माहितीचा बॅकअप आणि अधिकृत प्रवेशाचे नियंत्रण यंत्रणा प्रभावीपणे राबविणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
