४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ९० केंद्रांवर नवी मुंबई महापालिकेचे नियोजन

महिनाभरानंतर आज पहिल्या मात्रेचे लसीकरण

महिनाभरानंतर आज पहिल्या मात्रेचे लसीकरण

नवी मुंबई : लस उपलब्ध होत नसल्याने नवी मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर फक्त दुसऱ्या मात्रेचे लसीकरण करण्यात येत होते. पहिल्या मात्रेचे लसीकरण १८ ते ४४ वयोगटासाठी ३ जूनपासून तर ४५ वर्षांवरील नागरिकांना महिनाभरापासून बंदच आहे. केंद्रांवर रांगा लावूनही लस मिळत नसल्याने संताप व्यक्त होत होता. गुरुवारी महापालिकेला कोव्हिशिल्डच्या १७,५०० तर कोव्हॅक्सिनच्या ५००० मात्रा मिळाल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी महिनाभरानंतर प्रथमच ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिली मात्रा देण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे.

नवी मुंबईसाठी गेले काही दिवस अल्प प्रमाणात लस मिळत आहे. तर काही दिवस लसच मिळालेली नाही. त्यामुळे आठवडय़ातून फक्त दोन दिवसच लसीकरण पालिका केंद्रांवर करता आले आहे. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने महापालिका प्रशासनाने काही मोजक्याच केंद्रांवर फक्त दुसऱ्या मात्रेचे लसीकरण करण्यात येत होते तेही अल्प प्रमाणात. त्यामुळे लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप होता. लसीकरण केंद्रांवर नागरिक रांगा लावत होते, मात्र लस न मिळाल्याने परत जात होते. १८ ते ४४ वयोगटासाठी ३ जूनपासून तर ४५ वर्षांवरील नागरिकांना महिनाभरापासून पहिल्या मात्रेचे लसीकरण बंद आहे.

गुरुवारी ठाणे जिल्ह्य़ासाठी १ लाख ५१ हजार लशींचा साठा उपलब्ध झाला असून नवी मुंबई महापालिकेला कोव्हिशिल्डच्या १७,५०० तर कोव्हॅक्सिनच्या ५ हजार मात्रा मिळाल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शुक्रवारी ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी पालिकेच्या ९१ लसीकरण केंद्रांवर पहिली मात्रा देण्याचे नियोजन केले आहे.

शहरातील लसीकरण

* पहिली मात्रा :  ६,५५,५६२

* दुसरी मात्रा : २,०२४५३

* एकूण  : ८,५८०१५

* लसपुरवठा

* कोव्हिशिल्ड : १७,५००

* कोव्हॅक्सिन : ५०००

शहरात ज्याप्रमाणे शासनाकडून लस मिळते त्याप्रमाणे लसीकरणाचे नियोजन केले जाते. गुरुवारी लस प्राप्त झाल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांना शुक्रवारी पहिल्या मात्रेचे लसीकरण करण्यात येणार आहे.

-रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, नवी मुंबई महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Navi mumbai municipal corporation plan at 90 centers for vaccination above 45 zws 70 years

ताज्या बातम्या