|| विकास महाडिक

८० मेगावॉट वीजनिर्मितीचे नवी मुंबई महापालिकेचे नियोजन

नवी मंबई : मुंबई पालिकेने मध्य वैतरणा धरणात हाती घेतलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या धर्तीवर नवी मुंबई पालिकाही मोरबे धरणावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची तयारी करीत आहे. या प्रकल्पातून ४० ते ८० मेगावॉट वीजनिर्मिती होऊ शकणार असून पालिकेच्या सार्वजिनक उपक्रमांसाठी ही वीज वापरात येणार आहे.

आठ वर्षांपूर्वी या धरणाच्या भिंतीवर सौर ऊर्जाचे पॅनल ठोकून दीडशे कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प नियोजित होता. मात्र माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकल्पाला केराची टोपली दाखवली होती. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना पालिकेने आता हा नवा प्रकल्प उभारण्याची चाचपणी सुरू केली आहे.

मोरबे धरणाच्या दीडशे एकर क्षेत्रातील काही भागात तरंगते सौर ऊर्जा पॅनल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे  कमीत कमी ४० ते जास्तीत जास्त ८० मेगावॉॅट वीज तयार होण्याची शक्यता आहे. हा संपूर्ण प्रकल्प हा खासगी व सार्वजिनक भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविला जाणार असल्याने प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीला पालिकेच्या तिजोरीतून निधी देण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.

या प्रकल्पातून तयार होणारी वीज महावितरण कंपनीला हस्तांतरित केली जाणार आहे. त्यामुळे पालिकेचे सार्वजनिक उपक्रमातील वीज बिलावर होणारी खर्चवगळता पालिकेला १७ ते २० कोटी वर्षाला नफा होण्याची शक्यता या प्रकल्पातून व्यक्त केली जात आहे.  पाण्यावर तंरगते सौरऊर्जा प्रकल्प हा पर्यावरण आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने अधिक प्रभावी ठरणार आहे.

सौरऊर्जा निर्मितीत नवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून मुंबई पालिकेच्या धर्तीवर मोरबे धरणात तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करणार आहे. यामुळे ४० मेगावॉट वीज प्रारंभीच्या काळात तयार होऊ शकणार आहे. यामुळे पालिकेचे सर्व खर्च वजा करता १७ ते २० कोटी रुपये वाचणार आहे. या प्रकल्प पीपीपी तत्त्वावर करण्याचे विचाराधीन आहे.  -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका